belgaum

भाषा संघर्षासाठी नव्हे, भावना व्यक्त करण्यासाठी – डॉ. पी. डी. पाटील

0
364
 belgaum

बेळगाव लाईव्ह |

भाषा ही मातेप्रमाणे पूजनीय असून कोणतीही भाषा असो, तिचा सन्मान होणे अत्यावश्यक आहे. मात्र अलीकडील काळात भाषेचा वापर लोकांमध्ये द्वेष पसरविण्यासाठी व घरे पेटविण्याचे साधन म्हणून होत असल्याचे चित्र अत्यंत दुर्दैवी आहे. भाषा ही संघर्षासाठी नव्हे, तर भावना व्यक्त करण्यासाठी, दुःख व कष्ट मांडण्यासाठी असते. भाषेच्या नावाखाली होणारी कोणतीही हिंसा कधीही योग्य ठरू शकत नाही, असे ठाम मत ज्येष्ठ विचारवंत डॉ. पी. डी. पाटील यांनी व्यक्त केले.

बेळगाव येथील सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने आयोजित पुष्प पहिले ‘प्रबोधनातून परिवर्तनाकडे’ या विषयावरील बॅरिस्टर नाथ पै व्याख्यानमालेत ते बोलत होते. या व्याख्यानमालेचे उद्घाटन मराठा मंदिरचे अध्यक्ष अप्पासाहेब गुरव यांच्या हस्ते झाले. यावेळी सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष नेताजी जाधव, उपाध्यक्ष रघुनाथ बांडगी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

डॉ. पाटील पुढे म्हणाले की, मातृभाषेवर नितांत प्रेम असणे स्वाभाविक आहे; मात्र दुसऱ्याच्या भाषेचा द्वेष करण्याची मानसिकता समाजासाठी घातक आहे. यासाठी समाजात व्यापक प्रबोधनाची गरज आहे. राष्ट्रभाषा शिकणे आवश्यकच असून, सध्याच्या ज्ञानयुगात इंग्रजी ही ज्ञानभाषा असल्याने ती आत्मसात करणे काळाची गरज बनली आहे. संगणक व आधुनिक तंत्रज्ञानाचे तत्त्वज्ञान इंग्रजीत असल्याने भाषा शिकणे ही एक कला आहे, असेही त्यांनी नमूद केले.

समाजातील बदलत्या वास्तवावर भाष्य करताना डॉ. पाटील यांनी चिंता व्यक्त केली की, समाज आधुनिकतेकडे वाटचाल करीत असला तरी वृद्धाश्रमांची संख्या वाढत आहे, ही गंभीर बाब आहे. काही राजकीय शक्ती जाती-जातींमध्ये संघर्ष निर्माण करून त्यातून स्वतःचा लाभ साधण्याचा प्रयत्न करीत आहेत. समाजाने विज्ञानाच्या आधारे प्रगतीकडे जाणे आवश्यक असताना काही प्रवृत्ती समाजाला विज्ञानाकडून पुराणमतवादाकडे ढकलत असून त्यामुळे मानवी मूल्यांचा ऱ्हास होत आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

समाजात जागृती निर्माण करून परिवर्तन घडवून आणण्यात पत्रकारांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे नमूद करत त्यांनी निर्भीड आणि प्रामाणिक पत्रकारांच्या पाठीशी समाजाने ठामपणे उभे राहावे, असे आवाहन केले.

यावेळी सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने देण्यात येणारे पत्रकार पुरस्कार प्रदान करण्यात आले. पत्रकार सुशांत कुरंगी, मंजुनाथ पाटील, महिला पत्रकार पुरस्कार अक्षता नाईक व विमला चिनकेकर यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमातून उपस्थितांमध्ये प्रबोधन, सामाजिक बांधिलकी आणि मूल्याधिष्ठित विचारांची जाणीव अधिक दृढ झाल्याचे चित्र दिसून आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.