बेळगाव लाईव्ह : बेळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमधील (एपीएमसी) दलालांच्या कारस्थानामुळे स्थानिक गाजर उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. स्थानिक गाजराचे दर पाडण्यासाठी दलालांनी बाहेरच्या राज्यातून गाजर आयात केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. या प्रकारामुळे बाजार आवारात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.
बेळगाव एपीएमसीमध्ये कालपर्यंत १० किलो गाजराला ३५० रुपये इतका दर मिळत होता. मात्र, हा दर पाडण्याच्या उद्देशाने स्थानिक दलालांनी महाराष्ट्रातून गाजर आयात करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे स्थानिक बाजारपेठेतील दरावर मोठा परिणाम होऊन शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.
महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातून आलेल्या गाजरासाठी १० किलोला केवळ १८० रुपये दर निश्चित करण्यात आला आहे. बाहेरील गाजर निम्म्या दरात उपलब्ध करून देऊन स्थानिक गाजराचे भाव पाडण्याचे हे दलालांचे षडयंत्र असल्याचे शेतकऱ्यांनी म्हटले आहे. या धोरणामुळे स्थानिक शेतकऱ्यांवर मोठा अन्याय होत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे.

दलालांच्या या कृतीचा निषेध करण्यासाठी शेतकऱ्यांनी महाराष्ट्रातून गाजर घेऊन आलेली वाहने एपीएमसीबाहेरच अडवून धरली. बाजार समितीच्या प्रवेशद्वारावरच वाहने रोखून शेतकऱ्यांनी आपला तीव्र रोष व्यक्त केला आहे. दलालांच्या या भूमिकेमुळे शेतकऱ्यांनी बाजार समिती प्रशासनाविरोधातही संताप व्यक्त केला आहे.
बाजार समितीतील दलालांनी महाराष्ट्रातील गाजर खरेदी करू नये आणि स्थानिक गाजर कालच्याच ३५० रुपये दराने खरेदी करावे, असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे. स्थानिक उत्पादकांना प्राधान्य देऊन त्यांना योग्य न्याय द्यावा, अशी आग्रही मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.





