बेळगाव लाईव्ह :कुऱ्हाडीचा दांडा गोत्यास काळ… तसंच शेतकऱ्याचे अवजार असलेली आकडीच त्याच्या जीवावर उठली…
कष्ट, घाम आणि मेहनतीवर उभ्या असलेल्या शेतकऱ्याच्या आयुष्याचा शेवट किती अचानक आणि वेदनादायी असू शकतो, याचे हृदयद्रावक उदाहरण खानापूर तालुक्यातील मोहिशेत (ता. खानापूर) येथे पाहायला मिळाले. गुरुवारी सायंकाळी गवत आणण्यासाठी गेलेल्या कृष्णा गोविंद मिराशी (वय ४५) या कष्टकरी शेतकऱ्याचा अत्यंत दुर्दैवी मृत्यू झाला. रोजच्या वापरातील, शेतकऱ्याचे अवजार असलेली आकडीच त्यांच्या मृत्यूचे कारण ठरली.
कुटुंबाचा कर्ता पुरुष, संसाराचा आधार आणि शेतीत राबणारा बळीराजा असलेले कृष्णा मिराशी हे इतर शेतकऱ्यांसोबत राघोबा आयकर यांच्या सर्वे नंबर १ मधील शेतात गवताची वाहतूक करण्याचे काम करत होते. दिवसभराच्या कष्टानंतर सायंकाळी चहा पिण्यासाठी ते गवताच्या गंजीवरून खाली उतरत असताना त्यांच्या हातात आकडी होती. मात्र, नियतीने घात केला. अचानक पाय घसरला आणि तोल जाऊन ते खाली कोसळले.
या अपघातात त्यांच्या हातातील आकडीचे लोखंडी टोक थेट पोटात घुसले. क्षणार्धात मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव सुरू झाला. सहकाऱ्यांनी घाईघाईने त्यांना खानापूर सरकारी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू होण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मेहनतीच्या दिवशी, शेतातच शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
या घटनेची नोंद खानापूर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक एल. एच. गवंडी करीत आहेत. कृष्णा मिराशी यांच्या अचानक जाण्याने मिराशी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावात शोककळा पसरली आहे. रोज राबून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारा बळीराजा आज कायमचा हरपला आहे.
दरम्यान, शेतात काम करत असताना मृत्यू झाल्याने कृषी खात्याने सदर शेतकऱ्याच्या कुटुंबाला तातडीने नुकसानभरपाई द्यावी, तसेच खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर यांनी पुढाकार घेऊन आमदार निधीतून मिराशी कुटुंबाला आर्थिक मदत करून न्याय मिळवून द्यावा, अशी जोरदार मागणी परिसरातून होत आहे.





