Friday, November 14, 2025

/

कणेरी मठाचे काडसिद्धेश्वर स्वामीजींना विजापूर जिल्ह्यात प्रवेशबंदी

 belgaum

बेळगाव लाईव्ह : अलीकडेच एका सार्वजनिक कार्यक्रमात कणेरी मठाचे अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी यांनी बसव संस्कृती अभियान आणि लिंगायत मठाधीशांबद्दल अपमानास्पद आणि धार्मिक भावना दुखावणारे वक्तव्य केले होते. या वक्तव्यामुळे तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असून, विविध भागांमध्ये निषेध आंदोलने सुरू झाली आहेत. या पार्श्वभूमीवर, खबरदारीचा उपाय म्हणून विजापूर जिल्हा प्रशासनाने स्वामीजींना १४ डिसेंबरपर्यंत म्हणजे सुमारे दोन महिने विजापूर जिल्ह्यात प्रवेश करण्यास बंदी घातली आहे.

महाराष्ट्रातील जत तालुक्यातील बीळूर येथे नुकत्याच पार पडलेल्या एका कार्यक्रमात अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजींनी लिंगायत मठाधीशांच्या संघटनेद्वारे राज्यात राबवण्यात येणाऱ्या बसव संस्कृती अभियानावर आणि या अभियानाचे नेतृत्व करणाऱ्या मठाधीशांवर अवमानकारक आणि अपशब्द वापरले होते. यामुळे विजापूर, बसवकल्याण, कूडलसंगम, बेळगाव, दावणगेरे, बिदर, गदग यासह अनेक भागांमध्ये स्वामीजींविरोधात तीव्र निषेध नोंदवण्यात आला.

या पार्श्वभूमीवर, स्वामीजी बसवनबागेवाडी येथे समर्थ सद्गुरु सिद्धरामेश्वर महाराज यांच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाला मिळाली होती. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमात गोंधळ होण्याची आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन, पोलीस खात्याच्या शिफारशीनुसार जिल्हाधिकारी डॉ. आनंद के. यांनी तत्काळ आदेश जारी केला. या आदेशानुसार, कणेरी स्वामीजींना १४ डिसेंबरपर्यंत बसवनबागेवाडी आणि संपूर्ण विजापूर जिल्ह्यात प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.