बेळगाव लाईव्ह : बेळगाव डीसीसी बँक अर्थात बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीवरून वातावरण तापलेले असताना सदर बँक ही शेतकऱ्यांची असल्यामुळे त्यात राजकीय नेत्यांनी पडू नये. या निवडणुकीतील राजकीय नेत्यांचा सध्याचा हस्तक्षेप लक्षात घेता ही निवडणूक स्थगित करून पुढे ढकलावी, अशी मागणी राष्ट्रीय रयत संघाचे नेते प्रकाश नायक यांनी केली आहे.
शहरातील कन्नड साहित्य भवन येथे आज गुरुवारी सकाळी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. प्रकाश नायक म्हणाले की, सध्या बेळगाव जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय नेत्यांमध्ये जो संघर्ष सुरू आहे, जी दुर्दैवी परिस्थिती निर्माण झाली आहे ती आपल्या सर्वांना माहित आहे.
मागील वेळी या बँकेच्या निवडणुकी वेळी कुकरचे वाटप वगैरे प्रकारांवरून घराघरांमध्ये नवरा बायकोमध्ये भांडणाचे प्रसंग उद्भवले होते. सध्याही तेच सुरू असून पक्षीय राजकारण डीसीसी बँकेच्या निवडणुकीमध्ये आणले जात आहे. बँकेवर आपली सत्ता स्थापन करण्यासाठी खानापूर तालुक्यातील या बँकेचे सदस्य असलेल्यांना 25 -50 लाखाचे आमिष दाखवले जात आहे. हा प्रकार पाहता सदर बँकेची निवडणूक ही खरंच शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी, सहकारासाठी आहे की वैयक्तिक राजकीय स्वार्थासाठी अथवा एखाद्या नेत्याच्या प्रतिष्ठेसाठी आहे? असा प्रश्न पडू लागला आहे.
आमची मागणी ही आहे की या निवडणुकीत कृषी क्षेत्राशी संबंधित अथवा ज्यांना बँकिंग क्षेत्राचा अनुभव आहे अशा व्यक्तींना प्राधान्य दिले जावे. सध्या कांही राजकीय नेते, लोकप्रतिनिधी बाहेरून या निवडणुकीचे नेतृत्व करून आपले वर्चस्व प्रस्थापित करण्याद्वारे सहकारी बँकांची लूट करत आहेत, हा प्रकार थांबला पाहिजे.
बेळगाव डीसीसी बँक ही मोठी आर्थिक उलाढाल करणारी संस्था ही ग्रामीण भागाच्या कल्याणासाठी, शेतकऱ्यांच्या विकासासाठी स्थापन करण्यात आली आहे. त्यामुळे कृपया या बँकेच्या निवडणुकीत राजकारण करू नये. राजकीय नेत्यांनी अथवा सार्वत्रिक निवडणुकीत निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी या बँकेच्या निवडणुकीमध्ये हस्तक्षेप करू नये, अशी आमची शेतकरी संघटनेची कळकळीची विनंती आहे, असे नायक म्हणाले.
सध्या डीसीसी बँकेच्या निवडणुकीच्या बाबतीत राजकीय नेत्यांकडून जो गोंधळ घातला जात आहे, जी तणावाची परिस्थिती निर्माण होत आहे ती पाहता हे सर्व भारतीय संविधानाच्या विरोधात घडत आहे असे म्हणावे लागेल. तेंव्हा भारतीय रिझर्व बँकेने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन शेतकऱ्यांच्या हितासाठी नियमानुसार यावेळची बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक पार पाडावी अन्यथा ती रद्द करून पुढे ढकलावी. सदर बँकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने सध्या जे लाजिरवाणे प्रकार घडत आहेत त्याकडे जिल्हा प्रशासनासह निवडणूक आयोगाचे साफ दुर्लक्ष करत आहे ही अत्यंत खेदाची बाब आहे.
सध्याची परिस्थिती पाहता आमची एकच मागणी आहे डीसीसी बँकेची सध्याची निवडणूक स्थगित केली जावी. सदर बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे. तेंव्हा या बँकेच्या निवडणुकीमध्ये राजकीय नेत्यांनी पडू नये असे स्पष्ट करून डीसीसी बँकेच्या निवडणुकीत योगदान देणारे जिल्ह्यातील विविध पीकेपीएस अर्थात कृषी पत्तीन संस्थांचे सदस्य जर राजकीय नेते अथवा लोकप्रतिनिधींशी संगणमत करून असतील तर त्यांच्यावर समस्त शेतकरी बांधव भविष्यात बहिष्कार टाकतील, असा इशारा प्रकाश नायक यांनी दिला. याप्रसंगी राष्ट्रीय रयत संघाचे राज्य सचिव केशव नंदी, रवींद्र सुपन्नावर, महांतेश कमती आदी उपस्थित होते.



