बेळगाव लाईव्ह :कॅम्प येथील धोबी घाटाजवळ सार्वजनिक ठिकाणी अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी जात असलेल्या दोघा युवकांना कॅम्प पोलिसांनी अटक करून त्यांच्या जवळील 11,850 रुपये किमतीचा 237 ग्रॅम गांजा जप्त केला.
पोलिसांनी अटक केलेल्या युवकांची नावे यल्लाप्पा लक्ष्मण देसुरकर (वय 25) आणि आनंद विलास पाटील (वय 26, दोघेही रा. मारुती गल्ली, बेनकनहळ्ळी बेळगाव) अशी आहेत.
कॅम्प येथील धोबी घाटाजवळ सार्वजनिक ठिकाणी अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी दुचाकीवरून जात असलेल्या उपरोक्त दोघांना कॅम्प पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस उपनिरीक्षक ए. रुक्मिणी व त्यांच्या सहकाऱ्यांनी अडवून तपासणी केली असता त्यांच्याजवळ गांजा आढळून आला.
सदर 237 ग्रॅम गांजासह आरोपींकडून रोख 520 रुपये पोलिसांनी जप्त केले. अटक केलेल्या दोन्ही युवकांवर अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गावठी दारू विकणाऱ्या इसमाला अटक; 44 लिटर दारू जप्त
बसवान कुडची, देवराज अरस कॉलनी येथील गौरीनगर परिसरात गावठी दारू विकणाऱ्या एका इसमाला माळमारुती पोलिसांनी काल सोमवारी अटक करून त्याच्या जवळील 4,400 रुपये किमतीची 44 लिटर गावठी दारू जप्त केली.
पोलिसांनी अटक केलेल्या इसमाचे नांव सिद्राई भीमाप्पा करीकट्टी (वय 65, रा. हुल्यानूर, ता. बेळगाव) असे आहे. सिद्राई हा गौरीनगर परिसरात गावठी दारू विकत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी धाड टाकून त्याला ताब्यात घेतले. त्याचप्रमाणे त्याच्याकडील 44 लिटर गावठी दारू, रोख 380 रुपये आणि स्टीलचा एक तांब्या जप्त केला. माळमारूती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची व त्यांच्या सहकाऱ्यांनी उपरोक्त कारवाई केली. याप्रकरणी माळ मारुती पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.