बेळगाव लाईव्ह : खानापूर तालुक्यातील हेम्मडगा येथे भीमगड वन विभागातील तळेवाडी गावातून स्वेच्छेने या भागातून बाहेर पडू इच्छिणाऱ्या २७ कुटुंबांना मंत्री ईश्वर खंड्रे यांच्या हस्ते धनादेश वितरित करण्यात आले. याप्रसंगी बोलताना खंड्रे म्हणाले, वन कर्मचाऱ्यांसोबतच वनवासी बांधवांनी पिढ्यानपिढ्या वनाचे संरक्षण केले आहे.
आता आधुनिक जगात त्यांना मूलभूत सुविधा मिळवून देत समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे ही काळाची गरज आहे. वन्यजीवनाचे संरक्षण करण्यात तळेवाडी वनवासीय भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे, असे मत वनमंत्री ईश्वर खंड्रे यांनी व्यक्त केले.
भीमगड वनक्षेत्रात एकूण १३ गावे असून सुमारे ७५४ कुटुंबे वास्तव्य करत आहेत. यापैकी तळेवाडीतील २७ कुटुंबांनी स्वतःहून चांगले जीवन जगण्यासाठी समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्याचा निर्णय घेतला आहे, असे खंड्रेंनी सांगितले.
या कार्यक्रमाचे उद्घाटन सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी केले. यावेळी बोलताना ते म्हणाले, गेल्या वीस वर्षांपासून ही मागणी प्रलंबित होती. मंत्री खंड्रे यांनी अत्यंत सकारात्मक दृष्टीने आणि जलद गतीने हे काम पूर्ण केले आहे. त्यांचे अभिनंदन. त्यांच्या प्रयत्नांमुळे आज या कुटुंबांना नवीन आयुष्य जगण्याची संधी मिळत आहे.

खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर यांनीही खंड्रेंच्या कार्याचे कौतुक केले. वनवासी बांधवांनी देखील सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.
या कार्यक्रमाला प्रमुख वन्यजीव संरक्षक सुभाष मालकडदे, कंपाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी राधा देवी, जिल्हाधिकारी महंमद रोशन, जिल्हा पोलीस अधीक्षक भीमाशंकर गुळेद, मुख्य वनसंरक्षक मंजुनाथ चौव्हाण, उपवनसंरक्षक मारिया ख्रिस्तराज यांच्यासह अनेक अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.