बेळगाव लाईव्ह : रविवार, १८ मे रोजी सायंकाळी ठीक ८:०० ते ८:१५ या वेळेत हनुमान नगर भागात वीज पुरवठा खंडित करण्यात येणार आहे. आग आणि इतर आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी काय करावे, याची माहिती देण्यासाठी आणि तयारीचा भाग म्हणून ही मॉक ड्रिल आयोजित करण्यात आली आहे.
हेस्कॉम प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, हिंडलगा गणपती मंदिर परिसर, बंजारा कॉलनी, केएलई इंटरनॅशनल शाळेकडील रस्ता, बॉक्साइट रोड, कुमारस्वामी ले-आऊट, कुवेम्पू नगरातील काही भाग आणि हनुमान नगर सर्कल या भागांमध्ये रविवारी रात्री ८ ते ८.१५ या वेळेत वीज पुरवठा बंद राहील. त्यामुळे या भागातील नागरिकांनी सायंकाळी ७:५५ पूर्वीच आपले इन्व्हर्टर, जनरेटर आणि इतर विजेवर चालणारी सर्व उपकरणे बंद ठेवावीत.

या मॉक ड्रिलमुळे नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत त्वरित आणि योग्य प्रतिसाद देण्यासाठी प्रशिक्षण मिळणार आहे. त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन हेस्कॉमने केले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशात युद्धजन्य परिस्थिती किंवा इतर कोणत्याही आपत्कालीन स्थितीत नागरिकांनी कसे वागावे, आग लागल्यास स्वतःचा बचाव कसा करावा आणि भीती न बाळगता परिस्थितीचा सामना कसा करावा, यासाठी हे प्रात्यक्षिक महत्त्वाचे आहे. याच उद्देशाने हनुमान नगर आणि कुवेम्पू नगरची निवड करण्यात आली आहे.
हेस्कॉम प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, या वेळेत त्यांनी आपले इन्व्हर्टर, जनरेटर आणि इतर विजेवर चालणारी उपकरणे बंद ठेवावीत.
हनुमान नगर आणि कुवेम्पू नगरमध्ये सुमारे ३५०० घरे आणि १५१ व्यावसायिक संकुले आहेत. विशेष म्हणजे, राज्याचे काही महत्त्वपूर्ण मंत्री आणि लोकप्रतिनिधी यांचे निवासस्थान देखील याच भागात आहेत.
या मॉक ड्रिलच्या वेळी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. तसेच, या संपूर्ण प्रात्यक्षिकाचे ड्रोन कॅमेऱ्याद्वारे चित्रीकरण करण्यात येणार असून, त्याचे फुटेज महानगरपालिकेला सादर केले जाईल.
या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये आपत्कालीन परिस्थिती हाताळणीबाबत जागरूकता निर्माण होईल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे. त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.