बेळगाव लाईव्ह :बेळगावला हॉकी खेळाचा गौरवशाली इतिहास आहे. बेळगावने देशाला बंडू पाटील, शंकर लक्ष्मण, शांताराम जाधव सारखे ऑलंपियन हॉकीपटू दिले आहेत. हॉकीचा तो सुवर्णकाळ बेळगावमध्ये पुन्हा यावा अशी बेळगाव जिल्हा हॉकी संघटना अर्थात हॉकी बेळगावची इच्छा असून त्यासाठी दर्जेदार हॉकीपटू घडवण्याचे प्रयत्न सातत्याने केले जात आहेत. हे उन्हाळी हॉकी शिबिर देखील त्याच प्रयत्नांचा एक भाग आहे, अशी माहिती हॉकी बेळगावचे सरचिटणीस आणि माजी मातब्बर हॉकीपटू प्रशिक्षक सुधाकर चाळके यांनी दिली.

हॉकी बेळगाव संघटनेतर्फे टिळकवाडी येथील सुभाषचंद्र (बोस) लेले मैदानावर गेल्या 1 एप्रिलपासून येत्या 31 मे 2025 पर्यंत 8 ते 20 वर्षे वयोगटातील मुला-मुलींसाठी मोफत हॉकी प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर हॉकी प्रशिक्षक चाळके बेळगाव लाईव्हशी बोलत होते.
ते म्हणाले की, बेळगाव जिल्हा हॉकी संघटना दरवर्षी मुला मुलींसाठी मोफत हॉकी प्रशिक्षण शिबिर आयोजित करत असते बेळगावला हॉकीचा गौरवशाली इतिहास आहे बेळगाव मधून बंडू पाटील शंकर लक्ष्मण शांताराम जाधव यांच्यासारखे ऑलिंपिक हॉकीपटू तयार झाले आहेत. त्यांचा आदर्श घेऊन बेळगावातील मुलांनी हॉकीमध्ये चांगला नावलौकिक मिळवावा अशी आमची इच्छा आहे. त्यासाठी लष्करातून सेवानिवृत्त झालेले आम्ही सात-आठ हॉकीपटू दररोज सकाळी 6:30 ते 8:30 -9 वाजेपर्यंत लेले मैदानावर मुलांना हॉकी प्रशिक्षण देत असतो. या शिबिरात मुलांना हॉकी कशी खेळावी? आणि त्यात कसे पारंगत व्हावे? याचे प्राथमिक धडे दिले जातात.
आमच्या या शिबिराला दरवर्षी मुला -मुलींचा उत्तम प्रतिसाद मिळत असतो यावेळी 120 मुलांनी नांव नोंदणी केली होती आणि त्यापैकी सध्या नियमितपणे सुमारे 70 मुलं -मुली हॉकीचे प्रशिक्षण घेत आहेत. दर्जेदार हॉकीपटू निर्माण व्हावेत हा या शिबिराचा उद्देश आहे. या शिबिरात सहभागी मुला-मुलींना स्पर्धात्मक हॉकीचा अनुभव मिळावा यासाठी त्यांना दसरा क्रीडा स्पर्धा, राज्य निवड चांचणी साई निवड चांचणी, डीवायईएस निवड चांचणीसाठी तयार केले जाते.
सध्याच्या घडीला बेळगाव जिल्हा हॉकी संघटनेने तयार केलेल्या चार ते पाच मुली साईमध्ये, तसेच दोन-तीन मुली व दोन-चार मुले डीवायईएसमध्ये हॉकीचे पुढील प्रशिक्षण घेत आहेत. या पद्धतीने दरवर्षी खेळाडूंची निवड केली जाते. बेळगावातील हॉकीचे पूर्वीचे सोनेरी दिवस परत आणायचे हे जिल्हा हॉकी संघटनेचे ध्येय आहे, असे स्पष्ट करून आमचे हे शिबिर दरवर्षी मोफत भरवले जाते, प्रशिक्षणार्थींकडून एक पैसाही न घेता उलट आम्ही संघटनेचे पदाधिकारी, सदस्य स्वखर्चातून त्यांना दररोज दूध, अंडी, केळी, बिस्किट असा चांगला प्रोटीन युक्त आहार (डायट) देत असतो, अशी माहिती हॉकी प्रशिक्षक सुधाकर चाळके यांनी दिली.
अन्य एक हॉकी प्रशिक्षक निवृत्त ऑनररी कॅप्टन उत्तम शिंदे हे शिबिराबद्दल माहिती देताना म्हणाले की, आम्ही सकाळी 6:45 वाजल्यापासून शिबिरार्थींना हॉकीचे प्राथमिक प्रशिक्षण देतो. बेळगावसह खानापूर, हुंचनहट्टी, कंग्राळी, नावगे, किणये वगैरे गावातील 8 ते 20 वर्षे वयोगटातील मुला-मुलींचा या शिबिरात सहभाग आहे. सदर शिबिर सकाळी 9 वाजेपर्यंत चालते. त्यामध्ये सर्वप्रथम मैदानाला पाच फेऱ्या मारून त्यांच्याकडून धावण्याचा सराव करून घेतला जातो त्यानंतर त्यांच्याकडून शारीरिक व्यायाम करून घेतले जातात सदर दीड ते दोन तासाच्या प्रशिक्षण कालावधीतमध्ये थोडे विश्रांती दिली जाते. व्यायाम झाल्यानंतर हॉकीचे प्राथमिक धडे दिले जातात, असे हॉकी प्रशिक्षक शिंदे यांनी सांगितले.