बेळगाव लाईव्ह :महाराष्ट्राप्रमाणे बेळगाव परिसरातील पैलवानांना राजकीय, औद्योगिक व सहकार क्षेत्रातून मानधनाच्या स्वरूपात आश्रय मिळायला हवा. तसे झाल्यास येथील उदयोन्मुख व होतकरू पैलवान देखील अल्पावधीत मातब्बर बनून आपल्या गावाचे, राज्याचे आणि देशाचे नांव उज्वल करू शकतील, असे मत कुस्ती प्रशिक्षक नवीन पाटील यांनी व्यक्त केले.
सध्या कुस्ती मैदानांचा हंगाम सुरू आहे, या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. प्रशिक्षक पाटील यांनी सांगितले की, पूर्वी आपल्या देशात राज्याश्रय मिळणारा कुस्ती हा खेळ आता लोकाश्रयावर अवलंबून आहे. कुस्ती मैदानाच्या आयोजकांना महिना -दोन महिने देणगी जमा करण्यासाठी परिश्रम घ्यावे लागतात. देणगीदार शोधावे लागतात.
अलीकडच्या काळात कुस्ती हा महागडा खेळ झाला आहे. ताकदीचा मल्ल बनण्यासाठी खुराकाचा खर्च अफाट आहे. त्यामुळे सर्वसामान्य घरातील मल्लांना मैदानातून मिळणाऱ्या मानधनावर खर्च भागवताना कसरत करावी लागते. महाराष्ट्रात राजकीय, उद्योग आणि सहकार क्षेत्रातून पैलवानाना मानधन सुरु केले जाते. त्या पद्धतीने बेळगाव परिसरात पैलवानांना मानधन सुरु झाल्यास उदयोन्मुख मल्लांना प्रोत्साहन मिळून त्यांची कारकीर्द बहरू शकते. त्याचप्रमाणे चांगली कुस्ती करणाऱ्या मल्लांना आखाड्यात कुस्तीप्रेमींनी आपल्यापरीने अर्थ सहाय्य केल्यास त्यांनाही बळ मिळेल.
कुस्तीसाठी तोडीस तोड पैलवानांच्या जोड्या कशा निवडल्या जातात? याबद्दल माहिती देताना पैलवानांची जोड ठरवताना त्यांचा अभ्यास केला जातो. विविध मैदानात कमिटीचे सदस्य त्यांचे निरीक्षण करतात. याखेरीज अलीकडे सोशियल मीडियाच्या माध्यमातून त्यांचा खेळ पाहून जोड ठरवली जाते, असे असे सांगून सोशियल मीडियाच्या माध्यमातून देशातील तसेच जगभरातील कुस्त्या पाहण्याची संधी मिळते.

विदेशात असणाऱ्या भारतीयाना आपल्याकडील कुस्ती सोशियल मीडियाच्या माध्यमातून पाहायला मिळते. मैदानाचे थेट प्रक्षेपण असेल तर देशभरातील कुस्त्या घरबसल्या पाहता येतात ही जमेची बाजू आहे, असे नवीन पाटील यांनी सांगितले.
दर्दी कुस्ती शौकीन काटा जोड कुस्त्यांना पसंदी देतात. तर काहींना मनोरंजन कुस्ती आवडते. मात्र ती कांही खरी कुस्ती नाही. मनोरंजन कुस्ती ही नकली असते. त्यामुळे प्रामुख्याने कुस्ती मैदानातील पहिल्या तीन -चार नंबरच्या कुस्त्या पाहून कुस्तीशौकीन मैदानाना हजेरी लावतात हेही नाकारता येत नाही. अलीकडच्या काळात विदेशी पैलवानांबद्दल कुस्ती शौकीनांमध्ये आकर्षण आहे. कारण इराण, इजीप्त, अमेरिका, जॉजिया आदी देशातील मल्लानी वेगवान चमकदार खेळाचे प्रदर्शन करत भारतीय पैलवानांना चितपट केले आहे, असे त्यांनी पुढे स्पष्ट केले.
बेळगाव परिसरात नव्याने सुरु झालेल्या कुस्ती मैदानांमुळे उदयोन्मुख पैलवान तयार होत आहेत. त्याचबरोबर अनेक गावात तालमी पुन्हा सुरु झाल्या आहेत. मोठ्या मैदानांबरोबर खळ्यांच्या कुस्त्या भरवण्याची परंपरा अनेक गावांनी जपली आहे.
आनंदवाडी, मुतगे, कणबर्गी, कडोली, सांबरा, निलजी, कंग्राळी, मजगाव, पिरनवाडी, सावगाव, येळळूर, संतीबस्तवाड, खणगाव, बसवणकुडची, उचगाव, मच्छे, शिंदोळी आदी गावांनी कुस्ती परंपरा आजच्या आधुनिक युगात देखील अबाधित ठेवली आहे ही अतिशय समाधानाची बाब आहे. विशेष करून बेळगाव पूर्व भागात कुस्तीला चांगले दिवस आले आहेत, असे कुस्ती प्रशिक्षक नवीन पाटील यांनी सांगितले.