Wednesday, April 23, 2025

/

हिरेबागेवाडी येथे घरफोडी; 1.36 लाखांचा ऐवज लंपास

 belgaum

बेळगाव लाईव्ह :हिरेबागेवाडी येथे बंद घराचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी 1 लाख 36 हजार 800 रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने व महागडे साहित्य लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे.

बेळगाव तालुक्यातील फडी बसवेश्वरनगर, हिरेबागेवाडी येथील सुजाता मल्लाप्पा कुंभार यांनी याबाबत हिरेबागेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

सदर फिर्यादीनुसार गेल्या 11 व 12 एप्रिल 2025 दरम्यान त्या आपल्या घराला कुलूप लावून परगावी म्हणजे काकती येथील आपल्या बहिणीच्या घरी गेल्या होत्या. ही संधी साधून चोरट्यांनी सुजाता यांच्या घराचा कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला.

त्यानंतर बेडरूम मधील ट्रेझरीमध्ये ठेवलेले सोन्या -चांदीचे दागिने व इतर महागड्या वस्तू चोरट्यांनी लंपास केल्या. चोरीला गेलेल्या मुद्देमालामध्ये 55 हजार रुपये किमतीचे 25 ग्रॅमचे सोन्याचे गंठण, 33 हजार रुपये किमतीचे 15 ग्रॅम वजनाचे सोन्याचे नेकलेस, 11000 रुपये किमतीची 5 ग्रॅम वजनाची बोरमाळ, 11000 रुपये किमतीचे 5 ग्रॅमचे सोन्याचे कानातील झुमके, 5 ग्रॅमची सोन्याची वाटी, 3 ग्रॅमच्या कानातील रिंगा वगैरे दागिन्यांसह रोख 10 हजार रुपयांचा समावेश आहे.

सुजाता कुंभार या काल रविवारी सकाळी 9:30 वाजण्याच्या सुमारास गावाहून घरी परतल्या, त्यावेळी चोरीचा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. त्यांनी तात्काळ हिरेबागेवाडी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.