बेळगाव लाईव्ह : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त दिवसभरात विविध ठिकाणी कार्यक्रम आटोपल्यानंतर बेळगावात मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे.
दरम्यान मिरवणुकीसाठी येणाऱ्या डीजे ट्रॅक्टरला अलतगा क्रॉसजवळ अपघात झाला असून या अपघातात एका तरुणाला गंभीर दुखापत झाली आहे.
बेळगावात १४ एप्रिल रोजी होणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुकीसाठी डीजे बॉक्स लावलेला ट्रॅक्टर अलतगा क्रॉसजवळ पलटी झाला.
या अपघातात भरत कांबळे (वय २४) हा युवक गंभीर जखमी झाला असून त्याच्या डोक्याला आणि कानाला गंभीर जखमा झाल्या आहेत, त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
प्राथमिक माहितीनुसार, ट्रॅक्टरच्या चाकाला अचानक पंचर आल्यामुळे वाहन अनियंत्रित होऊन उलटले. अपघातानंतर परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
जखमी युवकाला तातडीने जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. ही घटना काकती पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.