बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहर आणि परिसराच्या विकासासाठी बीयूडीएच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. 55 गावांचा समावेश, तलावांचा विकास, रस्त्यांचे नूतनीकरण यासह ई-खात्याला संधी देण्याबाबत आमदार आसिफ सेठ यांनी माहिती दिली आहे.
बेळगाव शहराच्या विकासासाठी आज बेळगाव शहर विकास प्राधिकरणाची (बुडा) अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. बैठकीत जिल्हा पालक मंत्री सतीश जारकीहोळी, महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, आमदार आसिफ सेठ, दक्षिण आमदार यांच्यासह बुडा सदस्य आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत बेळगाव तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींतील 55 गावांचा समावेश बीयूडीएच्या कार्यक्षेत्रात करून विकासकामे राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर शहरातील कणबर्गी येथील स्कीम नं. 61 या लॲआउटच्या कामासाठी 130 कोटींच्या निधीतून 50:50 टक्के वाटपाने काम सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. बेळगावातील मुत्यानट्टी येथील 13 एकर क्षेत्रातील तलावाच्या विकासासाठी 5 कोटी 20 लाख रुपयांचा तर सह्याद्रीनगर तलावासाठी 5 कोटी 75 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. शहरातील रस्त्यांच्या विकासासाठी 24 कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला असून त्यासाठी समर्पित महायोजना सल्लागार नियुक्त करण्यात येणार आहे, अशी माहिती बुडा अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे यांनी दिली.
यावेळी रामतीर्थनगर परिसर बुडा लॲआउटनंतर महापालिकेकडे वर्ग करण्यात आला असून, 2025-26 पासून ते महापालिकेच्या अधिपत्यात येणार आहे. नागरिकांना मालमत्ता दस्तऐवज मिळावा यासाठी विशेष सिंगल विंडो पद्धती सुरु करण्याची शिफारसही बैठकीत करण्यात आली.

या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांनी ‘ई-खाता’ विषयी महत्त्वपूर्ण माहिती दिली. त्यांनी सांगितले की, पूर्वी बाँडवर घरे खरेदी केलेल्या नागरिकांना आता त्यांच्या विज आणि पाणीबिलाच्या आधारे ई-खात्यात नोंदणीसाठी संधी देण्याची शिफारस करण्यात आली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री यांच्याकडे निवेदन देण्यात आले आहे. पूर्वी बाँडवर घरे घेतलेल्या लोकांना त्यांच्या वीज आणि पाणीबिलाच्या आधारे अधिकृतरित्या ई-खात्यात नावनोंदणी करता यावी अशी आमची मागणी आहे. मुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्र्यांना यासंदर्भात निवेदन सादर केलं आहे. यामुळे गरीब लोकांना दिलासा मिळेल. नागरिकांनी यापुढे बाँडवर घरे खरेदी करू नयेत. सरकारने अधिकृतरीत्या घर खरेदी-विक्री प्रक्रियेसाठी सुलभ व्यवस्था निर्माण करावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
या बैठकीत बोलताना पालकमंत्री सतीश जारकीहोळी म्हणाले, बेळगाव शहराला ‘बृहनबेळगाव’ या स्वरूपात विकसित करण्याचं स्वप्न आहे. मात्र, यासाठी अजून २ ते ३ वर्षांचा कालावधी लागेल. जिल्हाधिकारी कार्यालयाचं नवीन इमारत हे आमचं प्रमुख प्राधान्य असून ते तीन टप्प्यांत उभारण्यात येणार आहे. त्यासोबतच सीबीटी, आरटीओ कार्यालय, कणबर्गी योजना, रिंगरोड आणि बायपाससारखी महत्वाची कामं हळूहळू मार्गी लागत आहेत. पूर्वी बाँडवर खरेदी केलेल्या जागेवर बांधलेल्या घरांच्या नोंदणीसाठीही आता ई-खात्यात नाव नोंदवण्याची संधी देण्यात येणार आहे. पावसामुळे काही अडचणी निर्माण झाल्या असल्या तरी त्यावर त्वरित उपाययोजना राबवण्यात येतील. कोयना धरणातून पाणी सोडण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडे विनंती केली असून, जठ तालुक्याच्या पाणीपुरवठ्यासाठी देवघेव करार आवश्यक आहे. बेंगळुरू शहराचा विकास शेकडो वर्षांच्या योजनांमुळे शक्य झाला. तसंच दीर्घकालीन नियोजन आणि टप्प्याटप्प्याने काम करत बेळगावही लवकरच बृहनबेळगाव म्हणून आकार घेईल, असे मंत्री सतीश जारकीहोळी म्हणाले.

शहरातील पाणीप्रश्न सुटावा म्हणून एल अँड टी कंपनीला स्पष्ट निर्देश देण्यात आले असून, कामात हलगर्जी करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला. यावेळी बुडा आयुक्त शकील अहमद यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.