Wednesday, April 23, 2025

/

सरकारी मराठी शाळेत शिकलेली बनली MBBS

 belgaum

बेळगाव लाईव्ह : मराठी माध्यमात शिकला तर यश मिळत नाही असे म्हणणाऱ्यांना ग्रामीण भागातल्या सरकारी मराठी शाळेत शिक्षण घेऊन एमबीबीएस पास होऊ शकतो हे दाखवण्याचे काम हलग्याचा प्रतिभाने करून दाखवले आहे.

हालगा (ता. जि. बेळगाव) येथील प्रतिभावंत विद्यार्थिनी प्रतिभा परशराम चौगुले ही एमबीबीएसच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेत म्हैसूर मेडिकल कॉलेजमधून विशेष प्राविण्‍याने उत्तीर्ण झाल्याबद्दल मराठा जागृती निर्माण संघ बेळगावतर्फे तिचा तिच्या आई-वडिलांसह नुकताच सत्कार करण्यात आला.

हालगा येथील चौगुले निवास येथे काल रविवारी आयोजित या समारंभात मराठा जागृती निर्माण संघ बेळगावचे प्रमुख गोपाळराव बिर्जे यांच्या हस्ते डॉ. प्रतिभा चौगुले हिच्यासह तिचे वडील परशराम आणि आई संगीता यांचा शाल, साडी, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

डॉ. प्रतिभा हिचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण हलगा येथील मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये झाले आहे. त्यानंतर पदवी पूर्व द्वितीय वर्षात तिने 92 टक्के गुण संपादन करून म्हैसूर मेडिकल कॉलेजमध्ये गुणवत्तेवर प्रवेश मिळवला त्याचप्रमाणे कौतुकाची बाब म्हणजे शिष्यवृत्तीवर तिने आपले एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले आहे.

या सत्कार समारंभ प्रसंगी बोलताना गोपाळराव बिर्जे म्हणाले, प्रतिभाला डॉक्टरी पेशातून जनतेची सेवा करण्याची इच्छा आहे. तथापि माझ्या मते आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर आयएएस होऊन ती लोकांची अधिक सेवा करू शकते. तेंव्हा एमएस न करता तिने आयएएसची तयारी करावी आणि जिल्हाधिकारी होऊन आपल्या घराण्याचे व गावाचे नांव उज्वल करावे.Mbbs halga

यावेळी सेवानिवृत्त नौदल अधिकारी अप्पाजी चौगुले ज्योतिबा हलगेकर रूपाली गुरव आदींची शुभेच्छापर भाषणे झाली. सत्कार बद्दल कृतज्ञता व्यक्त करून डॉ प्रतिभा चौगुले हिने मला या यशासाठी माझे आई-वडील, बहिण पूजा व भाऊ प्रथमेश यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. आयएएससाठी मी नक्कीच प्रयत्न करेन. कारण मी इयत्ता आठवीत असल्यापासून गोपाळराव बिर्जे यांचे मार्गदर्शन मला लाभत आहे, असे सांगितले.

याप्रसंगी गोकुळ अकनोजी, सुमित मिरजी, धनाजी चौगुले, पुंडलिक पाटील, विजय हणमगौडा, चांगुना चिट्टी, रंजना मुतगेकर, रेणू पाटील, मल्लव्वा खन्नूकर, शीतल कमाल आदींसह बहुसंख्य हितचिंतक उपस्थित होते. अखेर सीए वनिता बिर्जे यांनी सर्वांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.