Wednesday, April 23, 2025

/

भाजप उत्तरतर्फे उपमुख्यमंत्र्यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा

 belgaum

बेळगाव लाईव्ह :सरकारी कामांच्या कंत्राटामध्ये मुस्लिमांना 4 टक्के आरक्षण सुविधा देण्यासाठी संविधानही बदलू असे वक्तव्य उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी केल्याचा आरोप करून त्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्ष बेळगाव उत्तर मंडलतर्फे आज सकाळी कित्तूर राणी चन्नम्मा चौकात आंदोलन छेडण्यात आले. यावेळी डिकेशि यांच्या प्रतिकृतीची तिरडी बांधून अंत्ययात्रा काढण्याद्वारे निषेध व्यक्त करण्यात आला.

शहरातील कित्तूर राणी चन्नम्मा सर्कल येथे भाजप नेते मुरूगेंद्रगौडा पाटील, डाॅ. रवी पाटील व उज्वला बडवानाचे यांच्या नेतृत्वाखाली आज मंगळवारी सकाळी जमलेल्या भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या विरोधात जोरदार निदर्शने करत त्यांचा निषेध केला.

तसेच काँग्रेस पक्ष संविधान विरोधी असल्याच्या घोषणा देऊन चौक दणाणून सोडला. संविधान विरोधी वक्तव्य करणाऱ्या उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे. अन्यथा मुख्यमंत्र्यांनी त्यांना पक्षातून काढून टाकावे अशी मागणी भाजप नेते व कार्यकर्त्यांनी केली. यावेळी कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री डि. के. शिवकुमार यांच्या प्रतिकृतीची तिरडी वरून बोंब मारत अंत्ययात्रा काढून आपला संताप व्यक्त केला.Protest against dcm

आंदोलन स्थळी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना भाजप नेते डॉ. रवी पाटील म्हणाले की, विशिष्ट अल्पसंख्यांकांना आरक्षण देण्यासाठी भाजप नेते डी. के. शिवकुमार देशाच्या संविधानात बदल करण्याची भाषा करत आहेत. हे चुकीचे असून हिंदूंचा देश असलेल्या भारतामध्ये हिंदूंना प्राधान्य दिले पाहिजे. डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी देशाच्या हितासाठी संविधानाची निर्मिती केली आहे. त्यामुळे त्यात बदल करण्याची आवश्यकता नाही. संविधानामुळेच सर्वांना समान अधिकार मिळत आहेत. तेंव्हा डी. के. शिवकुमार सारख्या वरिष्ठ काँग्रेस नेत्याने संविधान बदलण्याची भाषा करणे त्यांना शोभत नाही.

काँग्रेस नेते आपली होटबँक सुरक्षित रहावी यासाठी हे सर्व करत आहे. त्याऐवजी सर्वांनी चांगले काम करून कर्नाटक राज्याच्या विकासाकडे लक्ष द्यावे. लोकांनी तुम्हाला विश्वासाने निवडून दिले आहे, तेंव्हा त्यांच्यासाठी चांगले कार्य करणे तुमचे कर्तव्य आहे. या पद्धतीची वक्तव्य करून अशांतता निर्माण करू नये असे आवाहन करून यासाठीच आम्ही उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांचा आज जाहीर निषेध करत आहोत, असे डॉ. पाटील यांनी सांगितले.

यावेळी मुरूगेंद्रगौडा पाटील व उज्वला बडवानाचे यांनी देखील तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करून उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचा निषेध केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.