बेळगाव लाईव्ह :अनधिकृत वसाहतीतील मालमत्ता सरकारी करप्रणालीत आणण्यासाठी राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांना ई-खाता नोंद करण्यासाठी तीन महिन्यांची मुदत दिली आहे. यासाठी महापालिकेने सोमवारपासून विशेष मोहिमेला चालना दिली. राज्याचे सार्वजनिक बांधकाम आणि जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांनी या ई-खाता मेळाव्याचे उदघाटन करून लोकांनी सरकारने सुरू केलेल्या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
महापालिकेने कुमारगंधर्व रंगमंदिरात ई-खाता मेळाव्याचे आयोजन केले होते. पालकमंत्री सतीश जारकिहोळी प्रमुख पाहुणे होते. तर आमदार राजू सेठ अध्यक्षस्थानी होते. पालकमंत्री जारकिहोळी यांनी दीपप्रज्वलन करून या मेळाव्याला चालना दिली. अधिकृत मालमत्तांकडून महापालिका कर आकारत असते. अशा मालमत्तांना ए खाता प्रमाणपत्र देण्यात येते. पण, अनधिकृत वसाहतीतील मालमत्तांकडून कर आकारणी होत नाही.
या मालमत्तांची सरकार दरबारी नोंद होत नाही. त्यामुळे लोकांनाच त्रास होत असतो. याचा विचार करून सरकारने अशा मालमत्तांची बी खाता प्रणालीत नोंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे लोकांना यांचा लाभ होणार आहे, असे मत पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांनी व्यक्त केले.
यावेळी आमदार राजू सेट यांनी, सर्व मालमत्तांची नोंद करण्यासाठी सरकारने हा महत्वाचा उपक्रम हाती घेतला आहे. अनधिकृत वसाहतीतील घरे, मोकळ्या जागांचीही नोंद करून बी खाता प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. तीन महिने हा उपक्रम चालणार असल्यामुळे लोकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
यावेळी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, महापालिका आयुक्त शुभा बी., मावळत्या महापौर सविता कांबळे, उपमहापौर आनंद चव्हाण, विरोधी गट नेते मुजम्मील डोणी, रवी साळुंखे, महसूल उपायुक्त रेश्मा तालिकोटी, प्रशासन उपायुक्त उदयकुमार तळवार, नगरसेवक व इतर उपस्थित होते.