बेळगाव लाईव्ह :जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून तिसरे रेल्वे गेट टिळकवाडी येथील उड्डाण पुलाच्या खड्डे पडून वाताहत झालेल्या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम आज शनिवारी दिवसभर युद्धपातळीवर हाती घेऊन पूर्ण करण्यात आल्यामुळे नागरिकांसह वाहनचालकात समाधान व्यक्त होत आहे.
गेल्या पंधरा-वीस दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे तिसरे रेल्वे गेट टिळकवाडी येथील उड्डाण पुलाच्या रस्त्याची खड्डे पडून पार दुर्दशा झाली होती. यापैकी काही मोठे खड्डे तर जणू मृत्यूचा सापळाच बनले होते. खड्ड्याप्रमाणेच ठीकठिकाणी उखडलेली खडी रस्त्यावर पसरली असल्यामुळे हा रस्ता अपघात प्रवण बनला होता. त्यामुळे अलीकडे पुलाच्या या रस्त्यावर वारंवार अपघात घडत होते. सध्या सुरू असलेल्या पावसामुळे पाणी साचलेल्या खड्ड्यांचा अंदाज न आल्यामुळे या रस्त्यावरील अपघातांचे प्रमाण वाढवून अनेक जण जखमी झाले होते.
यासंदर्भात सोशल मीडिया आणि प्रसिद्धी माध्यमांनी आवाज उठवताच जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी नुकतीच या उड्डाणपुलाला भेट देऊन रस्त्याची पाहणी केली. तसेच उपस्थित अधिकाऱ्यांना दुर्दशा झालेल्या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करण्याचे आदेश दिले होते.
जिल्हाधिकाऱ्यांच्या त्या आदेशाची आज शनिवारी अंमलबजावणी करण्यात आली. तिसरे रेल्वे गेट उड्डाण पुलाच्या वाताहत झालेल्या रस्त्यावरील चिखल आणि खडी काढण्याचे काम आज सकाळपासून युद्धपातळीवर हाती घेण्यात आले होते.
यासाठी उड्डाणपूलाचा रस्ता दोन्ही बाजूला बॅरिकेड्स टाकून बंद ठेवण्यात आला होता. यावेळी कामगारांकडून एकीकडे रस्त्यावर पसरलेली खडी आणि माती काढण्याचे काम सुरू असताना दुसरीकडे रस्त्यावरील खड्ड्यांमधील गढूळ पाणी बुट्टीने काढून टाकत काँक्रीट मशीनच्या सहाय्याने ते खड्डे काँक्रीटनी बुजवण्याचे काम हाती घेण्यात आले होते.
उड्डाणपुलाचा रस्ता बंद करून युद्धपातळीवर रस्ता दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आल्यामुळे या रस्त्यावरून नेहमी ये -जा करणाऱ्या वाहन चालकांची मात्र आज गैरसोय झाली होती. तथापि पुलाचा रस्ता खड्डे बुजवून दुरुस्त केला जात असल्याचे कळताच वाहनचालक समाधान व्यक्त करताना दिसत होते.