बेळगाव लाईव्ह : शिक्षक हे द्वेष भावनेतून नव्हे तर मुलांमध्ये चांगला बदल घडावा, त्यांच्यात चांगले गुण यावेत यासाठी त्यांना वेळप्रसंगी मारत असतात. मुलांनी चांगलं शिकून मोठं व्हावं ही त्या मागची भावना असते. आज तुम्हा विद्यार्थ्यांना पाहून मला त्याची प्रचिती आली आहे. जन्माला आल्यानंतर मातृ ऋण, पितृ ऋण, गुरु ऋण याप्रमाणे शाळेचे ऋण देखील असते. यापैकी शाळेचे ऋण फेडण्याचा प्रयत्न तुम्ही केला आहे. ज्या शाळेत आपण शिकलो त्या शाळेबद्दल आपण ऋणी असले पाहिजे. अशी भावना प्रत्येकाच्या मनात असेल तर शाळेचा उत्कर्ष होण्यास वेळ लागत नाही असे मत हलगा मराठी शाळेचे माजी शिक्षक यु बी महागावकर यांनी व्यक्त केले.
बेळगाव तालुक्यातील हलगा या गावातील प्राथमिक मराठी शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा आणि गुरुवंदना कार्यक्रम उत्साहात पार पडला त्यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले शाळेसाठी फक्त पैसा दिल्याने काही होत नाही. शाळेतील शिक्षक, मुले यांचाही विचार झाला पाहिजे. या विचाराने प्रेरित होऊन तुम्ही आपल्या शाळेला खेळाचे साहित्य दिले ही अत्यंत कौतुकास्पद गोष्ट आहे. विद्यार्थी असताना त्यावेळी तुमच्यातील काही सुप्त गुण दिसले नाहीत मात्र त्या गुणामुळेच आज तुम्ही आज वकील, डॉक्टर, पत्रकार, संपादक, कंत्राटदार वगैरे पदांवर जाऊन पोहोचला आहातअसे गौरव उद्गार काढले.
१९९३-९४ या शाळातील इयत्ता सातवीच्या माजी विद्यार्थ्यांच्यावतीने या स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. शाळेसाठी घसरगुंडी पाळणे आदी खेलोपयोगी साहित्याची भेट माजी विद्यार्थ्यांच्यावतीने शाळेला देण्यात आली
यावेळी शाळेच्या प्रांगणात या खेळाच्या साहित्याचे अनावरण करण्यात आले.
या निमित्ताने माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावाही संपन्न झाला . तसेच शाळेच्या प्रांगणात वनमहोत्सव कार्यक्रम देखील पार पडला. ३१ वर्षानंतर भेटलेल्या माजी विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला.
विद्यार्थ्यांच्या वतीने गुरुजनांचे पाद्यपूजन करून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या वतीने माजी शिक्षक वर्ग यु बी महागावकर, कुंडेकर गुरुजी, सावंत शिक्षिका बनसुर गुरुजी तसेच कै. वाय. डी. येळ्ळूरकर, कै. डी. ए. डोंगरे यांच्या पत्नी शारदा डोंगरे आणि लक्ष्मी येळ्ळूरकर यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी कुंडेकर सर बनसुर सर विद्यमान मुख्याध्यापक कांबळे, मोरे गुरुजी आणि शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष मनोहर संताजी यांनी विचार मांडले. रेश्मा सामजी यांनी सूत्रसंचलन केले तर प्रकाश बेळगोजी यांनी प्रास्ताविक केले. सिद्राय कामती यांनी आभार मानले.