बेळगाव लाईव्ह :रायबाग फलोत्पादन खात्यातील कांही अधिकाऱ्यांनी खोट्या स्वाक्षऱ्या करून आमच्या नावाचा लाखो रुपयांचा निधी हडप केला आहे. तेंव्हा त्या अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करत बस्तवाड (ता. रायबाग) येथील अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी फलोत्पादन खात्यासमोर धरणे आंदोलन केल्याची घटना आज सोमवारी घडली.
बस्तवाड (ता. रायबाग) येथील अन्यायग्रस्त शेतकरी बसवंत भीमा बजंत्री, सिद्धाप्पा कल्लाप्पा मांग -हेगडे व प्रकाश कल्लाप्पा मांग -हेगडे यांच्यासह फलोत्पादन खात्याच्या योजनांचे लाभार्थी शेतकरी आणि शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपरोक्त मागणी केली आहे. तसेच तशा आशयाचे निवेदन मुख्यमंत्री, फळबागायत खात्याचे मंत्री व अन्य संबंधितांना धाडले आहे.
फलोत्पादन खात्याच्या योजनेअंतर्गत शेडनेट कामासाठी बसवंत भीमा बजंत्री, सिद्धाप्पा कल्लाप्पा मांग -हेगडे व प्रकाश कल्लाप्पा मांग -हेगडे या शेतकऱ्यांना मंजूर झालेला मदत निधी रायबाग फलोत्पादन खात्यातील कांही अधिकाऱ्यांनी खोट्या स्वाक्षऱ्या करून परस्पर लांबविला आहे. तेंव्हा या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर गुन्हा नोंदवून त्यांची संपत्ती जप्त करावी आणि त्यांना कारागृहात धाडावे.
तसेच या प्रकरणाची लोकायुक्तांकरवी चौकशी करून आम्हाला न्याय द्यावा. रायबाग फलोत्पादन खात्यातील कर्तव्यात चुकलेले रवींद्र हकाटी, मारुती कळ्ळीमणी, अशोक करेप्पगोळ, शिवानंद संसुद्दी आणि कल्लाप्पा गुडीमणी यांच्यावर कठोर कारवाई केली जावी. तसेच फसवणूक झालेल्या लाभार्थींच्या नावावर त्यांचे सहाय्य धन तात्काळ जमा केले जावे, अशा आशयाचा तपशील मुख्यमंत्र्यांना धाडलेल्या निवेदनात नमूद आहे.
मुख्यमंत्र्यांच्या नावे निवेदन सादर करण्याबरोबरच संबंधित अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी आपल्या मागणीच्या पूर्ततेसाठी आज सोमवारी सकाळी फलोत्पादन खात्याच्या कार्यालयासमोर धरणे सत्याग्रह केला. यावेळी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना हनुमंत बजंत्री या शेतकऱ्याने शेडनेट कामासाठी बसवंत भीमा बजंत्री, सिद्धाप्पा कल्लाप्पा मांग व प्रकाश कल्लाप्पा मांग या शेतकऱ्यांना मंजूर झालेला निधी रायबाग फलोत्पादन खात्यातील अशोक करेप्पगोळ, शिवानंद संसुद्दी, मारुती कळ्ळीमणी या अधिकाऱ्यांनी खोट्या सह्या करून हडप केला आहे. या तिघांनाही निलंबित केले पाहिजे.
या तिघांनी आमच्या अन्यायग्रस्त शेतकरी बांधवांचे प्रत्येकी 20 -20 लाख रुपये हडप केले आहेत असे सांगून सदर पैसे संबंधित शेतकऱ्यांना मिळेपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहील असे स्पष्ट केले. धरणे आंदोलनात बस्तवाड येथील शेतकरी व शेतकरी संघटनेचे पदाधिकारी बहुसंख्येने सहभागी झाले होते.