बेळगाव लाईव्ह :राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून बेळगाव रिंग रोडची माहिती प्रसिद्ध करण्यात आली असून त्यात एक टोल प्लाझाचाही समावेश आहे. त्यामुळे नियोजित रिंग रोडचा वापर करण्यासाठी नागरिकांना टोल भरावा लागणार आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या माहितीमध्ये रिंग रोडच्या पहिल्या पॅकेज मधील कामे नमूद आहेत. त्यात एक टोल प्लाझा असल्यामुळे रिंग रोडवर टोल नाका उभारून टोल आकारणी केली जाणार हे नक्की आहे. तथापि हा टोल नाका कोठे उभारायचा? हे अद्याप निश्चित झालेले नाही.
बेळगावचा हा नियोजित रिंग रोड 4 पदरी असणार आहे. या प्रकल्पाचा ठेका यापूर्वीच मेसर्स जी. आर. इन्फ्रा प्रोजेक्ट्स या कंपनीला देण्यात आला आहे. बेळगावचा नियोजित रिंग रोड 34.48 कि. मी. लांबीचा असणार असून त्याच्या निर्मितीसाठी 1,622 कोटी रुपयांचा निधी खर्च केला जाणार आहे.
या रिंग रोडमध्ये चार फ्लाय ओव्हर ब्रिज देखील बांधण्यात येणार आहेत. रिंग रोड निर्मिती वेळी एक मोठा पूल, त्याचप्रमाणे लहान आकाराचे 20 पूल आणि 17 ठिकाणी मोऱ्या बांधण्यात येणार आहेत. अवजड वाहने थांबण्यासाठी ‘ट्रक ले -बे’ ची निर्मिती केली जाणार आहे. नियोजित रिंग रोडला तब्बल 41 कि. मी. लांबीचा सर्व्हिस रोड असणार आहे.