बेळगाव लाईव्ह : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त कॅम्प परिसरातील कॅन्टोनमेंट बोर्ड मराठी हायस्कूल या शाळेतील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या बोलीभाषा शब्दकोशाचे प्रकाशन उत्साहात पार पडले. “ऋणानुबंध” असे शीर्षक देण्यात आलेल्या या हस्तलिखित ग्रंथात बेळगाव परिसरात बोलल्या जाणाऱ्या स्थानिक बोलीतील शब्द, वाक्प्रचार आणि त्यांचे अर्थ यांचा अमूल्य ठेवा जतन करण्यात आला आहे.
गेल्या दोन वर्षांपासून विद्यार्थ्यांनी परिसरात प्रत्यक्ष भेटी, संवाद आणि नोंदींच्या माध्यमातून बोलीभाषेतील शब्द संकलित केले. बदलत्या काळात लोप पावत चाललेल्या शब्दसंपत्तीचे जतन व्हावे आणि पुढील पिढीला हा भाषिक वारसा वाचता यावा, या उद्दात्त हेतूने हा उपक्रम राबविण्यात आला.
प्रकाशन प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. एन. बी. गावडे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करताना सांगितले की, “हा ग्रंथ भाषाप्रेमी आणि भाषा अभ्यासकांसाठी मैलाचा दगड ठरेल. विद्यार्थ्यांनी जतन केलेली ही शब्दसंपत्ती भविष्यात संशोधनासाठीही उपयुक्त ठरेल.”

या उपक्रमासाठी कुंभार सर यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले, तर मुख्याध्यापिका गावडे मॅडम यांची प्रेरणा मोलाची ठरली. हस्तलिखित शब्दकोशाचे प्रकाशन मुख्याध्यापिका, शब्दलेखन करणारे विद्यार्थी, शिक्षक व इतर विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी साकारलेला हा उपक्रम भाषेच्या जतन-संवर्धनासाठी प्रेरणादायी ठरत असून, स्थानिक बोलीभाषेच्या जपणुकीसाठी हे पाऊल निश्चितच महत्त्वाचे मानले जात आहे.




