बेळगाव लाईव्ह:बेळगाव शहरात मोकाट कुत्र्यांचे मनुष्यावरील हल्ल्यांचे प्रमाण वाढले असून पशु संगोपन खात्याकडून मिळालेल्या धक्कादायक माहितीनुसार शहरासह जिल्ह्यात वर्षभरात सुमारे 20 हजारहून अधिक जणांवर मोकाट कुत्र्यांनी हल्ला केला आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्यांमध्ये विद्यार्थी, महिला आणि वृद्धांची संख्या जास्त आहे.
पशु संगोपन खात्याच्या माहितीनुसार बेळगाव शहरात 15,000 हून अधिक तर जिल्ह्यात 77,000 हून अधिक भटकी कुत्री आहेत. मोकाट कुत्र्यांच्या वाढत्या हल्ल्यामुळे लोकांमध्ये विशेष करून विद्यार्थी व महिला वर्गात दहशतीचे वातावरण दिसून येते.
दुचाकींचा पाठलाग करणाऱ्या या कुत्र्यांमुळे अपघाताच्या घटनाही घडत आहेत. गेल्या चार वर्षात 70 हजाराहून अधिक जणांवर मोकाट कुत्र्यांनी हल्ला केला आहे. तसेच गेल्या तीन वर्षात हल्ला झालेल्यांपैकी चौघा जणांचा रेबीजमुळे मृत्यू झाला आहे. मोकाट कुत्र्यांचे सर्वाधिक हल्ले महापालिका क्षेत्रात झाले आहेत.
अलीकडे शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असतानाही बेळगाव महापालिकेकडून कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. त्यामुळे सर्वत्र भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे.
महापालिकेकडून श्रीनगरमध्ये निर्बिजीकरण केंद्र सुरू करण्यात आले असले तरी त्या ठिकाणी दिवसाला केवळ 30 कुत्र्यांवर नसबंदी शस्त्रक्रिया केली जाते.
त्यासाठी प्रत्येक कुत्र्यामागे 1600 रुपये खर्च करण्यात येतात. तथापि ही उपायोजना तोकडी पडत असून महापालिकेने मोकाट कुत्र्यांबाबत ठोस पावले उचलण्याची गरज व्यक्त केले जात आहे.