बेळगाव लाईव्ह :रोटरी क्लब ऑफ बेळगाव सेंट्रलतर्फे येत्या सात ते 11 मार्च 2024 या कालावधीत सीपीएड कॉलेज मैदानावर भव्य अशा ‘बेळगाव कृषी उत्सव -2024’ चे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती रोटरी क्लब ऑफ बेळगाव सेंट्रलचे अध्यक्ष मंजुनाथ अळवणी यांनी दिली.
कॉलेज रोडवरील हॉटेल आदर्श पॅलेस येथे आज मंगळवारी सकाळी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. नियोजित बेळगाव कृषी उत्सवासंबंधी माहिती देताना अध्यक्ष मंजुनाथ अळवणी म्हणाले की, रोटरीचे सामाजिक कार्य फार मोठे आहे.
आता आम्ही बेळगाव कृषी उत्सव ही नवीन संकल्पना कृषी खात्याच्या सहकार्याने भव्य प्रमाणात राबवणार आहोत. सदर रोटरी कृषी उत्सव येत्या 7 ते 11 फेब्रुवारी 2024 या कालावधीत पाच दिवसांसाठी आयोजित केला जाणार आहे. हा उपक्रम जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, कृषी खाते, फळबागायत खाते आणि रोट्रॅक्ट क्लब ऑफ बेळगाव सेंटर यांच्या सहकार्याने राबविला जाणार आहे. तरी शेतकरी बांधवांसह शहरवासीयांनी या कृषी उत्सवाचा बहुसंख्येने लाभ घ्यावा.
सीपीएड कॉलेज मैदानावर होणाऱ्या या उत्सवांतर्गत आयोजित प्रदर्शनात कृषी क्षेत्राशी संबंधित नवे तंत्रज्ञान तसेच संबंधित अन्य बाबी मांडण्यात येणार आहेत. सदर प्रदर्शनातील सुमारे 160 स्टॉल्स हे फक्त कृषी क्षेत्राशी संबंधित असणार आहेत. याव्यतिरिक्त 20 स्टॉल्स अन्नपदार्थांचे आणि 20 स्टॉल व्यापारी -व्यावसायिक असणार आहेत. या पद्धतीने कृषी उत्सव अंतर्गत एकूण 200 स्टॉल मांडण्यात येणार आहेत.
हे प्रदर्शन सकाळी 10 ते रात्री 9 वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले असणार आहे शेतकऱ्यांना आधुनिक नव्या तंत्रज्ञानाची ओळख व्हावी आणि लोकांनी नव्या पिढीने शेतीपासून दूर जाऊ नये या मुख्य उद्देशाने हे प्रदर्शन भरवण्यात आले असून त्यामध्ये एक प्रशिक्षण केंद्र देखील असेल, असे अध्यक्ष मंजुनाथ अळवणी यांनी सांगितले.
बेळगाव कृषी उत्सवांतर्गत आधुनिक शेतीसंदर्भात तज्ञ मंडळींची व्याख्याने आणि परिसंवादाच्या कार्यक्रमाचे आयोजन देखील केले जाणार आहे. ज्याचा निश्चितपणे शेतकऱ्यांना फायदा होईल. हा कृषी उत्सव असल्यामुळे सर्वसामान्य लोकांनी त्यामध्ये सहभागी व्हायचे नाही असे नाही.
आपल्या सर्वांची नाळ मातीशी जुळली असल्यामुळे प्रत्येकाने या प्रदर्शनाला भेट देऊन सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी सचिव अभय जोशी यांनी केले. पत्रकार परिषदेस रोटरी क्लब ऑफ बेळगाव सेंट्रलचे माजी अध्यक्ष दिनेश काळे, इव्हेंट चेअरमन शकील शेखाली, राजेंद्र देसाई आदी उपस्थित होते.