बेळगाव लाईव्ह : काँग्रेस सरकारमधील काही आमदार नाराज असल्यामुळे राज्यातील काँग्रेसचे सरकार फार काळ टिकणार नाही, ते लवकरच कोसळेल, असा दावा माजी उद्योग मंत्री मुरुगेश निराणी यांनी केला आहे.
बेळगाव महानगरपालिकेच्या आज झालेल्या महापौर उपमहापौर निवडणुकीसाठी उपस्थित असलेल्या मुरुगेश निराणी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सदर प्रतिक्रिया दिली आहे.
काँग्रेसने दिलेल्या पाच हमी योजनांचे स्वागत आहे. मात्र काँग्रेस सरकारने विकासासाठी अनुदान दिले नसल्याने काँग्रेसमधील अनेक आमदार नाराज आहेत. काँग्रेसचे हे सरकार अल्पावधीतच भाजपामुळे नव्हे तर काँग्रेसमधील नाराज आमदारांमुळे कोसळेल असा दावा त्यांनी केला आहे.
आगामी लोकसभेसाठी बेळगावमधून निवडणूक लढविण्यास आपण इच्छुक आहेत का? या प्रसारमाध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना मुरुगेश निराणी यांनी, पक्ष आपल्यावर जी जबाबदारी देईल, ती मी जबाबदारीने पार पाडण्यासाठी तयार असल्याचे सांगितले.