Thursday, May 9, 2024

/

विचारधारा एक झाली तरच आपला समाज टिकेल -कोंडुसकर

 belgaum

बेळगाव लाईव्ह :मनोज जरांगे -पाटील हे कोणत्याही राष्ट्रीय पक्षाच्या अथवा नेत्याच्या म्हणण्यानुसार न वागता एका विचारधारेने वागले आणि म्हणूनच ते इतकं मोठं आंदोलन यशस्वी करू शकले. हे ध्यानात घेऊन बेळगाव सीमाभागात मराठा समाज टिकावयाचा असेल तर समाजातील महनिय व्यक्ती आणि नेत्यांची विचारधारा एकच असली पाहिजे. सर्वांची विचारधारा एक झाली तरच आपला समाज टिकेल आणि कोणीही आपल्यावर अन्याय करू शकणार नाही, असे स्पष्ट मत सकल मराठा समाज बेळगावचे नेते रमाकांत कोंडुसकर यांनी व्यक्त केले.

एसपीएम रोड शहापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानामध्ये आज रविवारी सकाळी आयोजित महाराष्ट्रात मराठा समाजाला मिळालेल्या आरक्षणाच्या विजयोत्सवाप्रसंगी ते बोलत होते. कोंडुसकर म्हणाले की, मनोज जरांगे -पाटील हे कोणत्याही राष्ट्रीय पक्षाच्या अथवा नेत्याच्या म्हणण्यानुसार वागले नाहीत आणि म्हणूनच ते इतकं मोठं आंदोलन यशस्वी करू शकले.

आपण देखील आजच्या घडीला सीमा भागातील 865 गावासह संपूर्ण कर्नाटकात एक कोटीच्या घरात आहोत. मात्र तरीही आपली परिस्थिती बिकट का? याचा विचार आपण केला पाहिजे. आपण भाषणांमध्ये मराठा समाजावर होणाऱ्या अन्यायाची भाषा करतो. मराठा शेतकऱ्यांची शेती हडप केली जाते, या समाजाच्या मुलांना नोकऱ्या मिळत नाहीत, मराठा समाजाच्या लोकांचे हॉटेल्स बंद केली जातात. आपल्या शेतकऱ्याची शेती काढून घेतली जाते त्यावेळी मराठा समाजाचे नेते त्या ठिकाणी का येत नाहीत? खरंतर त्यावेळी सर्वांनी रयतेचे राज्य निर्माण करणाऱ्या छ. शिवरायांना स्मरणात ठेवून संघटित होऊन आवाज उठवावयास हवा. मात्र तसे घडत नाही याला कारण म्हणजे आपण आतून कोणत्या ना कोणत्या राष्ट्रीय पक्षाच्या नेत्यांचे तळवे चाटतोय. ही आपल्या परिसरातील सध्याची वस्तूस्थिती आहे. मनोज जरांगे -पाटील यांनी इतकं मोठं आंदोलन उभं करून यशस्वी केलं. याचं कारण म्हणजे ते कोणत्याही नेत्याच्या आश्रयाखाली किंवा मिंध्यात नव्हते.

 belgaum

जर येत्या काळात आपल्याला या ठिकाणी आपलं अस्तित्व टिकवायचं असेल. मराठा समाजाच्या शेतकऱ्यांची शेती आणि युवकांचे उद्योग टिकवायचे असतील. मराठा समाजातील मुले शिकून मोठी व्हायची असतील तर या समाजातील ज्या कोण महनिय व्यक्ती आहेत त्यांची ‘माझा समाज कसा सुधारेल’ ही एकच विचारधारा असली पाहिजे. विचारधारा एक झाली तर कोणीही आपल्यावर अन्याय करू शकणार नाही. शेतकऱ्यांची शेती कोणी काढून घेऊ शकणार नाही. मराठा समाजातील युवकांचे उद्योगधंदे बंद करण्याचे जे काम येथील काही राजकीय लोक करत आहेत त्याला आळा बसेल.Ramakant konduskar

हे करण्याची ताकद आम्हा तुम्हा सर्वांमध्ये आहे. मात्र दुर्दैवाने ते करण्याची आपली मानसिकता नाही. आपण अशा कार्यक्रमांमध्ये येतो, भाषण करतो आणि आपले कर्तव्य संपले म्हणून घरी निघून जातो आपण आपला व्यवसाय आणि बायकामुलं इतकच पाहतो आहोत. मनोज जरांगे -पाटील यांनी आंदोलन उभा केले त्यावेळी त्यांनी आपल्या घरच्यांना स्पष्टपणे सांगितलं की ‘परत आलो तर तुमचा नाही आलो तर समाजाचा’. हा आदर्श आमच्या नेते मंडळींनी घ्यावयास हवा तरच चिमूटभर समाजाची लोक जे आपल्या समाजावर अन्याय करत आहेत त्यांना लगाम बसेल. येथील मराठा समाजाच्या नेत्यांची मानसिकता जोपर्यंत बदलत नाही, तोपर्यंत या समाजावरील अन्याय थांबणार नाही हे लक्षात घेतले पाहिजे.

माझे येथील दोन्ही राष्ट्रीय पक्षात असलेले मराठा समाजाचे नेते व कार्यकर्त्यांना सांगू इच्छितो सापाला कितीही दूध पाजलं तरी तो एक दिवस उलटून डंख मारतोच हे त्यांनी लक्षात घ्यावं. आपल्या समाजावर जेंव्हा अन्याय होईल तो संकटात असेल त्यावेळी आपण सर्वांनी आपल्यातील मतभेद, पक्षभेद, आपले कामधंदे विसरून समाजाच्या पाठीशी उभे राहणे हे आपले कर्तव्य आहे. जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत आम्ही येथे टिकूच शकणार नाही असे सांगून आपल्या लढ्याचे नेतृत्व करण्यासाठी आपण किती दिवस बाहेरील लोकांवर विसंबून राहणार. रडगाणं गात राहणार. आपण छ. शिवाजी महाराजांचे मावळे आहोत. त्या विचारांनेच आपण लढला पाहिजे. सर्वांनी सर्वप्रथम आपल्या समाज आणि मातृभाषेला प्राधान्य दिले पाहिजे, असे रमाकांत कोंडुसकर यांनी शेवटी स्पष्ट केले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.