बेळगाव लाईव्ह:लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने बेळगाव जिल्ह्यातील 18 आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागली असून त्यांच्या पक्षाच्या उमेदवाराला किती मते मिळणार याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.
बेळगाव व चिक्कोडी लोकसभा मतदारसंघातील प्रत्येकी 8 आमदारांपैकी 5 आमदार काँग्रेसचे आहेत. कारवार मधील दोन आमदारांपैकी एक काँग्रेस व एक भाजपचा आहे. काल मंगळवारी मतदान प्रक्रिया समाप्त झाल्यानंतर या आमदारांनी व त्यांच्या समर्थकांनी आकडेमोड सुरू केली असून सदर आमदारांच्या कामगिरीवरच लोकसभेच्या उमेदवारांचे भवितव्य अवलंबून आहे.
बेळगाव लोकसभा मतदारसंघात लक्ष्मी हेब्बाळकर, राजू सेठ, महांतेश कौजलगी विश्वास वैद्य व अशोक पट्टण हे पाच काँग्रेस आमदार आहेत. तसेच याच मतदारसंघात अभय पाटील, रमेश जारकीहोळी व भालचंद्र जारकीहोळी हे भाजपचे तीन आमदार आहेत. चिक्कोडी मतदारसंघात सतीश जारकीहोळी लक्ष्मण सवदी, राजू कागे, गणेश हुक्केरी व महेंद्र तमन्नावर हे पाच काँग्रेस आमदार आहेत. तर शशिकला जोल्ले, दुर्योधन ऐहोळे व निखिल कत्ती हे तीन भाजप आमदार आहेत.
दरम्यान, गेल्या विधानसभा निवडणुकीत या आमदारांना मिळालेल्या मतांची गोळाबेरीज करता यावेळी त्यांची दमछाक झाली आहे. परिणामी विधानसभा निवडणुकीत जेवढी मते मिळाली तेवढी मते यावेळी त्यांच्या पक्षाच्या उमेदवाराला मिळणार का? याची उत्सुकता राजकीय वर्तुळात आहे.