बेळगाव लाईव्ह :गेल्या 12 वर्षांपासून विविध कारणास्तव रखडलेले राज्यातील रस्त्यांचे महत्त्वाचे प्रकल्प येत्या काळात प्राधान्याने पूर्ण केले जातील. या संदर्भात आपली केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याशी सविस्तर चर्चा झाली असल्याची माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिली.
शहरातील काँग्रेस भवन येथे आज सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. वेगवेगळ्या कारणास्तव गेल्या 12 वर्षांपासून राष्ट्रीय महामार्गाशी संबंधित राज्यातील अंदाजे 15 प्रकल्प एक तर थांबलेले आहेत किंवा त्यांचे काम संथ गतीने सुरू आहे. यासाठी अनेकदा चर्चा, बैठका झाल्या आहेत.
मुख्यमंत्र्यांची प्रतिनिधी मंडळं भेटली आहेत. अनेक मार्गाने प्रयत्न करूनही त्यावर उपाय सापडत नव्हता. मात्र गेल्या सहा महिन्यापासून आम्ही या समस्येचे निवारण करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. राष्ट्रीय महामार्गांच्या प्रलंबित कामाच्या एक एक समस्येवर आम्ही केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली आहे. त्यावेळी नितीन गडकरी यांनी यासंदर्भात राज्य सरकारने विशेष रस दाखवावयास हवा असे स्पष्ट केले असल्याचे सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले.
आगामी तीन महिन्याचा कालावधी घेऊन मार्च अखेरपर्यंत महामार्गाच्या रखडलेल्या प्रकल्पांसंदर्भातील समस्या सोडवू असे आश्वासन आम्ही केंद्रीय मंत्र्यांना दिले आहे. विजापूर -हुबळी महामार्गाचे काम 99 टक्के पूर्ण झाले असून फक्त एक टक्का शिल्लक आहे. याखेरीज हलगा -मच्छे बायपास रस्त्याच्या थांबलेल्या कामाची न्यायालयातील समस्या सुटलेली आहे. त्यामुळे येत्या एप्रिल किंवा मे महिन्यात या बायपास रस्त्याचे काम पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे असे मंत्री जारकीहोळी यांनी सांगितले.
राज्यात रस्त्यांसंदर्भात 10 हजार कोटींपैकी फक्त 2 हजार कोटी रुपयांचे काम झालेले आहे. उर्वरित 8 हजार कोटी रुपये खर्चाचे 15 प्रकल्प पूर्ण होणे बाकी असून ते पूर्णत्वाला नेण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.