बेळगाव लाईव्ह :राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून बेळगाव रिंग रोडसाठी पुन्हा एकदा हालचाली सुरू झाल्या असल्या तरी या प्रकल्पाला शेतकऱ्यांचा विरोध कायम आहे. रिंग रोडसाठी सीमा निश्चिती आणि झाडांचे सर्वेक्षण करण्याकरिता आलेले प्राधिकरणाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना झाडशहापूर येथील जागरूक शेतकऱ्यांनी माघारी पिटाळून लावल्याची घटना आज दुपारी घडली.
बेळगाव शहराच्या नियोजित रिंग रोडसाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून पुन्हा हालचाली सुरू झाल्या असून रिंग रोडसाठी किती झाडे तोडावी लागणार याची माहिती संकलित करण्याचे काम प्राधिकरणाकडून हाती घेण्यात आले आहे. त्या अनुषंगाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पथक आज शुक्रवारी दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास रिंग रोडसाठी झिरो पॉईंट असलेल्या झाडशहापूर येथे सर्वेक्षणाद्वारे झाडांची मोजणी व सीमा निश्चित करण्यासाठी दाखल झाले होते.
रिंग रोडला शेतकऱ्यांचा विरोध आहे हे लक्षात घेऊन पोलीस संरक्षणात आलेल्या या पथकाने झाडशहापूर येथील शिवारामध्ये सर्वेक्षणाचे काम हाती घेऊन मार्किंगचे खांब बसवण्यास त्याचप्रमाणे झाडांवर खाचा मारून रंग लावून क्रमांक टाकण्यास सुरुवात केली होती. मात्र याची माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी धाव घेतलेल्या भरमा नंदीहळळी यांच्यासह झाडशहापूर येथील अन्य शेतकऱ्यांनी जाब विचारून सर्वेक्षणाच्या कामाला जोरदार आक्षेप घेतला.
मोठ्या संख्येने जमलेल्या शेतकऱ्यांसमोर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र शेतकऱ्यांनी आपला विरोध कायम ठेवत झाडशहापूर येथील रिंग रोड संदर्भात उच्च न्यायालयाने स्थगिती आदेश दिला असताना तुम्ही सर्वेक्षणाचे काम कसे काय करू शकता? असा जाब विचारला. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांनी आपल्याकडील स्थगिती आदेशाची प्रत देखील अधिकाऱ्यांना दाखविली.
त्यामुळे निरुत्तर झालेल्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी स्थगिती आदेशाची प्रत आमच्या कार्यालयात सादर करा असे सांगून सर्वेक्षणाचे काम थांबवत तेथून काढता पाय घेतला.
सर्वेक्षणाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये भरमा नंदिहळ्ळी यांच्यासह कल्लाप्पा गोरल, परशराम गोरल, मोनाप्पा नंदिहळ्ळी, रामा नंदिहळ्ळी, रमेश गोरल आदी 25 -30 शेतकऱ्यांचा समावेश होता.
या शेतकऱ्यांनी सर्वेक्षणाच्या कामाला विरोध तर केलाच शिवाय स्थगिती आदेशाची प्रत दाखविल्यानंतर कायद्यानुसार आमच्या जमिनीत तुम्हाला कोणतेही काम करता येणार नाहीत असे अधिकाऱ्यांना बजावले आणि त्यांच्याच कर्मचाऱ्यांकडून रिंग रोड सीमा निश्चितीसाठी रोवलेले खांब उखडून टाकण्यास लावले.