बेळगाव लाईव्ह:दसरा सणानिमित्त गोकाकचे आमदार व माजी जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी आज मंगळवारी सकाळी जुन्या पी. बी. रोडवरील श्री रेणुका देवी मंदिर आणि मराठा समाजाचे आराध्य देवस्थान असलेल्या जतीमठातील श्री दुर्गा देवीचे दर्शन घेतले.
माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांचे शहरातील जुन्या पी. बी. रोडवरील श्री रेणुका मंदिर येथे मराठा समाजाचे नेते किरण जाधव व मंदिराचे ट्रस्टी राहुल मुचंडी यांनी स्वागत केले.
देवीचे दर्शन घेतल्यानंतर मंदिरातर्फे जारकीहोळी यांचा सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे जत्तीमठ येथे रमेश जारकीहोळी यांच्या हस्ते श्री दुर्गादेवीची विधिवत पूजा व आरती झाली. त्यानंतर जत्तीमठ देवस्थानाच्यावतीने सरपंच दत्ता जाधव यांच्या हस्ते जारकीहोळी यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. विश्वस्त मदन बामणे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. दत्ता जाधव यांनी जत्तीमठाबद्दल माहिती दिली.
यावेळी गेली दहा वर्षे नवरात्रोत्सव काळात जत्तीमठासाठी देवीच्या विविध रूपातील मूर्ती तयार करणाऱ्या मूर्तिकार वसंत उर्फ बाळू पाटील यांचा माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
मराठा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करूया मी नेहमी मराठा समाजा सोबत आहे असे आश्वासन यावेळी रमेश जारकिहोळी यांनी दिले. यावेळी बेळगावच्या मराठा समाजाच्या विकासाबद्दल पंच मंडळी सोबत चर्चा केली.
कार्यक्रमास किरण जाधव, चंद्रकांत कोंडुसकर, महेश शहापूरकर, माजी नगरसेवक रणजीत चव्हाण -पाटील, सागर पाटील, राहुल मुचंडी, विकास कलघटगी, विजय तम्मूचे आदी उपस्थित होते.