बेळगाव लाईव्ह: दक्षिण आमदार आणि पालकमंत्री या दोघांनीही वेळोवेळी मराठा समाजाचे खच्चीकरणच केलेले आहे. भाजप आणि काँग्रेसला एवढा मराठा समाजाचा पुळका आला असेल तर पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत दोन्ही पक्षांनी मराठा समाजाला उमेदवारी द्यावी, असे आवाहन करत भाजपने बेळगाव उत्तर मधून अनिल बेनके यांचा पत्ता का कापला? तर काँग्रेसने मराठा समाजाला कोणते मोठे पद दिले असा प्रश्न महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते अमित देसाई यांनी केला आहे.
महापालिकेत सध्या सुरू असलेल्या वादावर बोलताना त्यांनी बेळगाव लाईव्ह कडे ही प्रतिक्रिया दिली आहे. बेळगावात महापालिकेच्या राजकारणात काँग्रेस कडून भाजप आमदारावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत. ती भाजप विरुद्ध काँग्रेस अशी लढाई आहे. त्यात मराठा समाजाला गोवू नका. राष्ट्रीय पक्षातील मराठा नेत्यांनी आपल्या नेत्याचा भ्रष्टाचार लपविण्यासाठी समाजाच्या कुबड्या घेऊ नये. आधी त्यांनी आपल्या समाजासाठी, मातृभाषेसाठी काय योगदान आहे ते तपासावे. असा टोला देसाई यांनी लगावला आहे.
या अगोदर दोनदा बेळगाव मनपा बरखास्त झाली. त्यावेळी का भाजप काँग्रेसला मराठा समाजाचा कैवार आला नाही? आज मराठा समाजाचे नाव घेऊन मराठा दलित वाद पेटविण्याचा प्रयत्न होतोय, त्याचा निषेध देसाई यांनी व्यक्त केला आहे.
मला कन्नड येत नाही, असे सांगणाऱ्या महापौरांनी फाईल वर सही केली. आता त्या जात पुढे आणत आहेत. यापूर्वी त्यांनी किती वेळा मराठीसाठी आग्रह धरला होता? कधी तरी मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून प्रयत्न केला होता का? असा प्रतिप्रश्न करत मराठा समाजाचा कैवार फक्त महाराष्ट्र एकीकरण समितीने घेतला आहे. समितीच्या माध्यमातूनच मराठा समाज आणि मराठी माणसाची आंदोलने उभी आहेत. असेही त्यांनी यावेळी म्हटले.
मनपात लढणारा दक्षिण आमदार आणि पालक मंत्री या दोघांनीही चार पाच वेळेच्या आमदारकीच्या टर्म मध्ये मराठी समाजासाठी काय केले? याचा हिशोब द्यावा, काँग्रेस विरुद्ध भाजप असे राजकारण चालले आहे त्यात मराठा समाजाला का ओढता? तुम्हाला मराठा समाज नक्कीच धडा शिकवेल असा इशाराच त्यांनी दिला आहे.