बेळगाव लाईव्ह :राज्य सरकारने हरित सरोवर योजनेत बेळगाव तालुक्यातील तीन तलावांची निवड केली आहे. संतीबस्तवाड, बेकिनकेरे, न्यू वंटमुरी या गावातील तलावांची हरित सरोवर म्हणून निवड केली आहे. जिल्ह्यात दहा तलावांची निवड झाली आहे.
जिल्हयात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. तलाव पूर्णपणे सुकले आहेत. त्यामुळे यापुढे लोकांना व जनावरांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागणार असल्याची परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे.
ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात तलाव आहेत. पण त्यावर झालेले अतिक्रमण आणि त्याला पुनरुज्जीवन करण्यात न आल्याने तलावात वर्षभर पाणी थांबत नसून भूजल पातळी देखील घटली आहे. रोजगार हमी योजनेसह अमृत सरोवर, तलाव संजीवनी आदी योजनांच्या माध्यमातून तलावांचा विकास करण्यात येणार आहे.
जिल्ह्यात बेळगाव व खानापूर तालुक्यात प्रत्येकी तीन तलावांची यासाठी निवड झाली असून सौंदत्ती, रामदुर्ग, हुक्केरी आणि बैलहोंगल तालुक्यातील प्रत्येकी एक तलाव विकसित केला जाणार आहे.
जिल्ह्यात २९४ तलाव असून बहुतेक तलावात पाणी नाही. त्यामुळे शासनाने अशा तलावातील गावाकडच्या तलावांचा विकास करण्याचा निर्णय घेतला आहे. गावांमध्ये असलेल्या तलावांवरच अनेक शेतकरी पिकांना पाणी देण्यासाठी अवलंबून असतात.
त्याचबरोबर गावातील जनावरांना पिण्यासाठी पाणी या तलावांमधीलच वापरले जाते. मात्र दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने आता पुढील धोका रोखण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यादृष्टिकोनातून हरित तलावांची निर्मिती करण्यात येत आहे. त्यामुळे या गावातील चित्र बदलणार आहे.