घरात अठराविश्वे दारिद्य्र, त्यात मुलगा अंध पण, शिकण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले. पण, शिक्षणात रस नाही. त्याची बोटे तबल्यावर थिरकत होती.
त्याची ही रूची ओळखून कुटुंबियांनी अंध कार्तिकला तबला शिकवण्याचे ठरवले आणि कुटुंबियांचा हा विश्वास त्याने अल्पावधीतच सार्थ ठरवला. ही बातमी आहे संभाजी रोड, हिंदूनगर टिळकवाडी येथील अंध कार्तिक किशोर शिपूरकरची.
कार्तिक जन्मताच अंध. वडिल किशोर कपडे इस्त्री करण्यासाठी जातात. घरात चांगली परिस्थिती नाही. अशा स्थितीतही कुटुंबाने कार्तिकला अंध शाळेत दाखल केले. त्याठिकाणी त्याने चांगले शिक्षण घ्यावे, यासाठी प्रयत्न केले. पण, कार्तिकला शिकण्यात काहीही रस नव्हता.
त्यामुळे कुटुंबासमोर पेच होता. कार्तिकचा तबला शिक्षण्याकडे कल होता. त्यामुळे कुटुंबात चर्चा करून घरीच तबला शिक्षकाना बोलावून सराव सुरू झाला. कुणाच्या नशिबात काय असेल ते सांगता येत नाही. तुटपुंज्या परिस्थितीत गेली आठ वर्षे सतत जिद्दीने सराव करत तबला वादनामध्ये कार्तिकने विशेष प्राविण्य मिळवलेे.
त्याने प्रारंभिक परीक्षेत पहिल्या श्रेणीत, तर प्रवेशिका प्रथम परीक्षेत उच्च श्रेणीमध्ये यश मिळवले आहे. त्याच्या मनात आपण जसे शिकलो, तसेच आता आपल्यासारखी इतर मुलांना शिकविण्याचा त्याचा मानस आहे. त्या दृष्टीने त्याची धडपड सुरू आहे.
विनायक करडेगुद्दी या तबला शिक्षकानी त्याला तबला वादनाचे चांगले धडे दिले आहेत. आता कार्तिकला स्वत:च्या जीवावर पुढील यश संपादन करावे लागणार आहे. त्याचे वडिल आजही इस्त्री कामाला जातात. तर बहिण करूणा रिलायन्स मॉलमध्ये कामाला जाते आणि आई गृहीणी आहे. अश्या या मेहनती कार्तिकच्या कामगिरीला एक सल्युट व्हायलाच हवा..