बेळगाव लाईव्ह:महापालिकेत सर्वसाधारण सभा लांबणीवर पडावी, यासाठी अधिकारी वर्गाकडून प्रयत्न होत आहे. तीन वर्षांहून अधिक काळ महापालिकेत काम केलेल्या अधिकार्यांची बदली करण्यात यावी, असा ठराव या बैठकीत होणार असल्यामुळे काही अधिकार्यांनी ही बैठकच होऊ नये, यासाठी प्रयत्न चालवला आहे. पण, सत्ताधारी गटाने मात्र शुक्रवारीच बैठक घेण्यावर ठाम असल्याचे जाहीर केले आहे.
महापौर, उपमहापौर निवडणूक झाल्यानंतर पाच महिन्यानंतर महापालिकेत सभागृहाची पहिली सर्वसाधारण सभा 21 जुलै रोजी आयोजित करण्यात आली. पण, या दिवशी आयुक्त अशोक दुडगुंटी बंगळूर येथे बैठकीला असणार असल्यामुळे आणि कौन्सिल सेक्रेटरी गुरूसिद्धय्या हिरेमठ दहा दिवसांच्या रजेवर असल्यामुळे सभा लांबणीवर टाकण्याचा प्रयत्न अधिकार्यांकडून करण्यात आला.
पहिल्याच सर्वसाधारण सभेत नगरसेवक शंकर पाटील यांनी ज्या अधिकार्यांनी तीन वर्षांहून अधिक काळ महापालिकेत सेवा बजावली आहे. त्यांची बदली करण्यात यावी, असा प्रस्ताव विषय पत्रिकेत ठेवला आहे. या प्रस्तावाच्या बाजुने सभागृह असल्याचे दिसून येत आहे. पण, गेल्या अनेक वर्षांपासून महापालिकेत दबा धरून राहिलेल्या अधिकार्यांकडून या प्रस्तावाविरोधात काम सुरू झाले आहे. 21 जुलै रोजी बैठक होऊ नये. ती लांबणीवर टाकण्यात यावी, यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत.
आयुक्त अशोक दुडगुंटी 21 जुलै रोजी बंगळूर येथे बैठकीला उपस्थित राहणार आहेत. याशिवाय कौन्सिल सेक्रेटरी गुरूसिद्धय्या हिरेमठ हेसुध्दा दहा दिवसांच्या रजेवर आहेत. त्यामुळे सभेला आयुक्त आणि कौन्सिल सेक्रेटरी नसणार असल्यामुळे सभा लांबणीवर टाकावी, अशी सूचना महापौरांना करण्यात येत आहे.
पण, प्रामुख्याने अधिकार्यांच्या बदलीचा विषय सभेत येऊ नये, यासाठी खटाटोप सुरू असल्याचे समजते. पण, याविरोधात सत्ताधारी गट आक्रमक झाला असून 21 जुलै रोजीच बैठक घेण्यात यावी, यासाठी जिल्हाधिकारी आणि प्रादेशिक आयुक्त यांना महापौर शोभा सोमनाचे यांनी पत्र दिल्याचे समजते.