बेळगाव लाईव्ह : बेळगावमध्ये ज्या ज्या ठिकाणी स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत विकासकामे राबविण्यात आली आहेत, त्या ठिकाणच्या नागरिकांच्या तक्रारींची आणि तेथील निकृष्ट दर्जाच्या कामकाजाची माहिती पुढे येण्याची मालिका संपता संपत नाही. गेल्या काही महिन्यांपासून विविध ठिकाणच्या स्मार्ट सिटी कामकाजाचे पितळ उघडे पडत असून या कामकाजात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याच्या उघड तक्रारीही करण्यात येत आहेत. सध्या सुभाषनगर परिसरात अशाच पद्धतीने स्मार्ट सिटी कामाचे वाभाडे निघत असून मोठ्या प्रमाणात खर्च करून देखील येथील ड्रेनेज वाहिन्या बिनकामाच्या ठरत आहेत.
सुभाषनगर परिसरात मोठ्या प्रमाणात ड्रेनेजचे सांडपाणी रस्त्यावर थेट वाहात असून याचा त्रास येथील नागरिकांना सहन करावा लागत आहे. या भागात स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत मोठा ड्रेनेज प्रकल्प राबवून मोठ्या पाईपलाईन घालण्यात आल्या आहेत.
या भागात ड्रेनेज वाहिन्या अंडरग्राउंड घालण्यासाठी कृष्णदेवराय सर्कल (कोल्हापूर सर्कल) पासून सुभाषनगर, एसपी ऑफिसच्या बाजूला असलेल्या न्याय मार्गावर ड्रेनेज वाहिन्या घालून मुख्य पाईपलाईनशी जोडण्याचे काम करण्यात आले आहे. यासाठी तब्बल ६ महिने येथील रस्ते बंद ठेवण्यात आले होते. यादरम्यान ड्रेनेज वाहिन्यांसह ड्रेनेज चेंबर देखील नव्याने बांधण्यात आले होते.
सुभाष नगर मधील बिन कामाच्या ड्रीनेज वाहिन्या अन स्मार्ट सिटीचे काम pic.twitter.com/j0xeFOw40w
— Belgaumlive (@belgaumlive) July 19, 2023
सदाशिव नगर, शिवबसवनगर यासारख्या भागातील ड्रेनेज वाहिन्या मुख्य पाइपलाइनशी जोडण्यात आल्या आहेत. मात्र सुभाषनगर, वीरभद्रनगर आणि आसपासच्या भागातील कोणत्याही परिसराच्या ड्रेनेज वाहिन्यांचे कनेक्शन मुख्य ड्रेनेज वाहिन्यांना न जोडण्यात आल्याने ड्रेनेजचे पाणी ओव्हरफ्लो होऊन रस्त्यावर वाहत आहे. या भागात अनेक चेंबर बांधण्यात आले आहेत. मात्र सुभाषनगरसह येथील रेसिडेन्शिअल आणि कमर्शियल भागातील कोणत्याही ड्रेनेज वाहिन्या मुख्य पाइपलाइनशी जोडण्यात आलेल्या नाहीत. यामुळे वर्षातील बाराही महिने या भागातील नागरिकांना ड्रेनेजच्या सांडपाण्यातच रहावे लागण्याची वेळ येत आहे.
स्मार्ट सिटी अंतर्गत याच भागात तब्बल ६ महिने ड्रेनेज वाहिन्या घालण्याचे काम करण्यात आले. मात्र या कामाचे तीनतेरा वाजल्याचे चित्र सध्या सुभाषनगर भागात अनुभवायला मिळत आहे. आता या भागातील ड्रेनेजच्या सांडपाण्याची समस्या मिटवायची असेल तर पुन्हा एकदा झालेल्या कामाची पडताळणी करणे गरजेचे आहे. शिवाय या भागातील सर्व ड्रेनेज वाहिन्या मुख्य ड्रेनेज वाहिन्यांना जोडण्याचेही काम झाले पाहिजे. या आधी झालेल्या ड्रेनेज वाहिन्यांच्या कामकाजात कोणत्या वाहिन्या मुख्य ड्रेनेज वाहिन्यांना जोडण्यात आलेल्या नाहीत, हे देखील तपासून पाहणे गरजेचे आहे. येथील ड्रेनेज वाहिन्यांचे विकासकाम योग्य पद्धतीने करण्यात आले असते तर अशापद्धतीने तक्रारी पुढे आल्याचं नसत्या, अशी टीका येथील नागरिक करत आहेत.
यासंदर्भात येथील स्थानिकांनी महानगरपालिका प्रशासन, नगरसेवक आणि लोकप्रतिनिधींना अनेकवेळा निवेदने सादर केली आहेत. मात्र आजतागायत येथील रहिवाशांच्या मागणीला दाद देण्यात आली नाही. ज्यापद्धतीने या भागाच्या विकासासाठी पैसा खर्च करण्यात आला आहे, त्यानुसार या भागात त्या दर्जाची कामे झाली नसल्याची तक्रार या भागातील नागरीकातून होत आहे. विकासकाम केवळ कागदावरच राहिले असून प्रत्यक्षात मात्र विकासाचा पत्ताच नाही अशी रोखठोख तक्रारही या भागातील नागरीकातून करण्यात येत आहे.