बेळगाव लाईव्ह :खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची सर्वसाधारण सभा येत्या रविवार दि. ३० जुलै २०२३ रोजी राजा शिवछत्रपती स्मारक येथे सकाळी ११ वाजता बोलाविण्यात आलेली आहे.
सदर बैठकीत नवीन कार्यकारिणी स्थापन करण्याबाबत आणि नियंत्रण कमिटी निवड करण्याबाबत चर्चा आणि विचारविनिमय केला जाणार आहे. तरी खानापूर तालुक्यातील समस्त समितीप्रेमी जनतेने उपस्थित रहावे, असे आवाहन खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
विधानसभा निवडणुकीत आपला पराभव झाला, आपल्या उमेदवाराला कमी मते पडली तरी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती निराश झाली नाही. आता आपल्या कार्यकारिणीची पुनर्रचना करण्याद्वारे त्यांनी पुन्हा जोमाने कामाला लागणार असल्याचे संकेत दिले आहेत.
दुसरीकडे बेळगाव शहर आणि ग्रामीण मतदारसंघातील समिती उमेदवारांना अनुक्रमे दक्षिण मध्ये 65 हजार व ग्रामीण मध्ये44 हजार अशी चांगली मते पडली, तर बेळगाव उत्तरमध्ये 12 हजार मते पडली. बेळगावच्या या मतदार संघांमध्ये समितीला या पद्धतीने चांगले मतदान झालेले असताना देखील बेळगाव शहर आणि तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीमध्ये सर्वच स्तरावर सामसुम पहावयास मिळत आहे.
या उलट विधानसभेतील पराभवाची कारणमिमांसा करून आपली पूर्वीची कार्यकारणी बदलून नवी कार्यकारणी स्थापन करण्याद्वारे खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती नव्या हुरुपाने पुनश्च कार्यरत होण्याची तयारी करत आहे.
समस्त कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास जागवण्याबरोबरच उत्साह वाढवणारी ही कृती अत्यंत प्रशंसनीय म्हणावी लागेल. हा आदर्श बेळगाव शहर आणि तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने घेणे गरजेचे आहे.