सर्वेक्षणाच्या कामासाठी सरकारने देऊ केलेले मोबाईल फोन येत्या सोमवारी 10 जुलै रोजी पुन्हा सरकारला परत करण्याचा निर्णय समस्त अंगणवाडी शिक्षकांनी घेतला आहे. तसेच मोबाईल ऐवजी चांगल्या क्षमतेचे टॅब अंगणवाडी शिक्षिकांना देण्यात यावेत अशी आमची मागणी आहे, अशी माहिती अंगणवाडी टीचर्स अँड हेल्पर्स असोसिएशनच्या कर्नाटक राज्य सरचिटणीस जयम्मा यांनी दिली.
शहीद भगतसिंग सभागृह गिरीश कॉम्प्लेक्स बापट गल्ली येथे आज शनिवारी सकाळी आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर त्यांना नेमून दिलेल्या कामाव्यतिरिक्त सर्वेक्षण वगैरे इतर कामे सोपविले जातात. सर्वेक्षणाचे काम ऑनलाईन करावे लागणार असल्यामुळे अंगणवाडी शिक्षकांना सरकारकडून मोबाईल देण्यात आले आहेत.
मात्र हे मोबाईल मर्यादित क्षमतेचे असल्यामुळे त्यामध्ये माहिती संकलित करणे त्रासाचे ठरत आहे. याखेरीज ग्रामीण दुर्गम भागात या मोबाईलला रेंज मिळत नाही, त्यामुळे मोठी गैरसोय होऊन मनस्ताप सहन करावा लागतो.
याबाबत वेळोवेळी तक्रार करून देखील दखल घेतली जात नसल्यामुळे समस्त अंगणवाडी शिक्षिका येत्या सोमवारी 10 जुलै रोजी आपले मोबाईल फोन शिशु विकास योजना अधिकाऱ्यांकडे जमा करणार आहेत. सर्वेक्षणासाठी अंगणवाडी शिक्षकांना स्वतंत्र एप्लीकेशन दिले जात असले तरी अनेक ॲप्लिकेशन्स सेव्ह होत नाहीत. याकरिता अंगणवाडी शिक्षकांना मोबाईल ऐवजी टॅब द्यावेत, अशी आमची मागणी आहे, असे जयम्मा यांनी सांगितले.
अंगणवाडी शिक्षिका आणि कार्यकर्त्यांवर टाकण्यात येणाऱ्या कामाच्या अतिरिक्त बोजा बाबत माहिती देताना त्यांनी यापुढे फक्त आमच्या खात्याशी संबंधित कामे करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे असेही स्पष्ट केले.
यावेळी बोलताना अंगणवाडी टीचर्स अँड हेल्पर्स असोसिएशनचे बेळगाव जिल्हा अध्यक्ष ॲड. नागेश सातेरी यांनी अंगणवाडी शिक्षकांच्या मोबाईल समस्येबाबत थोडक्यात माहिती देऊन जिल्ह्यातील अंगणवाडी शिक्षकांकडून येत्या सोमवारी 10 जुलै रोजी सकाळी 11 वाजता शहरी भागासाठी श्रीनगर येथील बाल भवन येथे, तर ग्रामीण भागासाठी हालगा येथील सुवर्ण विधानसौध मधील शिशु विकास योजना अधिकाऱ्यांना मोबाईल परत दिले जाणार असल्याचे स्पष्ट केले. पत्रकार परिषदेस अंगणवाडी टीचर्स अँड हेल्पर्स असोसिएशनचे अन्य पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.