मान्सूनच्या आगमनाला झालेल्या विलंबाचा दुष्परिणाम कृषी क्षेत्रावर झाला असून जिल्ह्यातील भाजीपाला पिकांचे उत्पादन घटले आहे. परिणामी बाजारपेठेमध्ये सध्या भाजीपाल्यांचे दर गगनाला भिडले आहेत.
पावसाअभावी उत्पादन घटल्यामुळे सध्या बाजारपेठेत भाज्या आणि फळांचा तुटवडा निर्माण झाल्याचे पहावयास मिळत आहे. भाजीपाल्याच्या मागणीसह दरात वाढ झाली असून त्याचा फटका नागरिकांच्या खिशाला बसत आहे.
यंदा जून महिना संपत आला तरी मान्सूनच्या पावसाला खऱ्या अर्थाने सुरुवात झालेली नाही पावसाअभावी पेरलेली खरीप शेतपिके नष्ट झाल्या जमा असून भाजीपाला देखील मातीमोल झाला आहे.
यामुळे सध्या भाजी मार्केटमध्ये विविध भाज्यांचा तुटवडा निर्माण होऊन उपलब्ध भाजीपाल्यांचा दर गगनाला भिडला आहे. सध्या बटाटा आणि कांदे वगळता इतर सर्व भाज्यांचे दर वाढले असून ते पुढील प्रमाणे आहेत.
बिनिस प्रति किलो 150 रु., हिरवी मिरची प्रति किलो 120 रु., वाटाणे प्रति किलो 180 रु., टोमॅटो प्रति किलो 90 रु., भेंडी प्रति किलो 50 रु., मुळा प्रति किलो 50 रु., नवलकोल 40 रु., दोडकी 60 रु., वांगी प्रति किलो 60 रु., कोबी 40 रु., शिमला मिरची प्रति किलो 60 रुपये. फक्त बटाटा व कांदा यांचा सर्वसामान्य दर प्रति किलो 20 रु. इतका स्थिर आहे.