बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राकसकोप जलाशयाच्या पाणीपातळीत यंदा जून महिन्यात कमालीची घट झाली आहे. वळिवाची गैरहजेरी आणि लांबणीवर पडलेल्या मान्सूनमुळे राकसकोप जलाशय जून महिन्याच्या अखेरीस कोरडा पडला आहे. २८ जून उजाडला तरी पावसाने म्हणावी तशी हजेरी लावली नसून मुबलक प्रमाणात पाऊस न झाल्याने बेळगावकरांवर पाणी टंचाईच्या समस्येचे संकट ओढवले आहे.
यंदा उन्हाचा तडाखाही मोठ्या प्रमाणात होता. त्यामुळे शहरवासीयांना फेब्रुवारी महिन्यापासूनच पाण्याची समस्या उद्द्भवली. २४ तास पाणी योजना देखील कोलमडली. शहर परिसरात पाण्यासाठी नागरिक आणि पाणीपुरवठा मंडळाच्या अधिकाऱ्यांमध्ये वादावादीचे प्रसंग घडले. पाणी टंचाईच्या समस्येमुळे दोन दिवसा आड होणारा पाणीपुरवठा चार दिवसांवर होऊ लागला. यादरम्यान पाणी साठ्याची तजवीज करण्यासाठी छतावर गेलेल्या कोनवाळ गल्ली येथील एका महिलेचा मृत्यूही झाला.
दरवर्षी जून महिन्यात मान्सूनचे आगमन होते मात्र यंदा मान्सून लांबणीवर पडल्याने पावसाळ्याच्या तोंडावर बेळगावकरांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. शहरवासीयांना पाणीपुरवठा करण्यासाठी जलाशयाच्या डेड स्टोरेजमधून पाणी उपसा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला असून जलाशय संपूर्ण कोरडे पडल्याने आता पावसाची प्रतीक्षा लागली आहे.
दरम्यान गेल्या कित्येक वर्षात राकसकोप जलाशय तुडुंब भरत होता. मात्र यंदा पावसाअभावी जलाशय कोरडा पडला असल्याचे चित्र दिसत आहे. यादरम्यान जलाशयातील गाळ काढण्याची मनपा आणि लोकप्रतिनिधींकडे संधी चालून आली होती. जलाशयातील गाळ काढल्यास जलाशय अधिक खोल झाला असता. आणि शहरवासीयांची पाण्याची समस्या सुटली असती. गाळ काढण्यात आला असता तर जलाशयात अधिक पाणी साठा जमवता येणे शक्य होते. मात्र मनपा आणि लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे हि संधी हुकली आहे.
दरवर्षी जून महिन्यात सुरु होणाऱ्या पावसामुळे ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जलाशय तुडुंब भरतो. मात्र जून महिना संपत आला तरी अद्याप पावसाची हजेरी न लागल्यामुळे पाणी टंचाईचा प्रश्न अधिकच गंभीर होत चालला आहे. पावसाने दमदार हजेरी लावली नाही तर बेळगावकरांवर पाणी टंचाईची भयानक परिस्थिती ओढवण्याचीही शक्यता आहे.
राकसकोप जलाशयाची संपूर्ण शहराला पाणी पुरवठा करण्याची क्षमता आहे. उर्वरित उपनगरांसाठी हिडकल जलाशयातून पाणी पुरवठा करण्यात येतो. मात्र हिडकल जलाशयात देखील पाण्याची पातळी कमी झाली असून आता प्रत्येकाला पावसाची प्रतीक्षा लागली आहे. दरवर्षी जून-जुलै या दरम्यान होणाऱ्या पावसामुळे जलाशय तुडुंब भारतात. मात्र पावसा अभावी जून महिन्यातच जलाशये कोरडी पडत चालली असून बेळगावकरांना ऐन पावसाळ्यात पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. धार्मिक नियमानुसार आषाढी एकादशीनंतर पावसाचा जोर वाढतो असे मानले जाते. त्यामुळे आजची एकादशी झाल्यानंतर उद्यापासून बेळगावमध्ये जोरदार पाऊस होईल अशी आशा बेळगावकर व्यक्त करत आहेत.