बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्ह्यातील राजकारणात किंगमेकर ठरलेले आमदार सतीश जारकीहोळी यांची अपेक्षेनुसार बेळगाव जिल्हा पालकमंत्रीपदी नियुक्ती झाली असून ग्रामीण मतदार संघाच्या आमदार आणि महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याकडे विजयनगर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
बेळगाव जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदार संघांपैकी ११ मतदार संघात काँग्रेसने वर्चस्व प्रस्थापित केले असून बेळगावला मंत्रिपद देण्यात येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत होता. यानुसार पहिल्याच टप्प्यात आमदार सतीश जारकीहोळी यांना कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले.
सार्वजनिक बांधकाम विभागाची जबाबदारी सोपविल्यानंतर आज पुन्हा अधिकृत आदेश जाहीर करण्यात आला असून यानुसार बेळगाव जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी सतीश जारकीहोळी यांचीच वर्णी लागली आहे.
यापूर्वीदेखील सतीश जारकीहोळी यांनी बेळगावचे जिल्हा पालकमंत्रिपद उपभोगले असून ग्रामीण मतदार संघाच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांना देखील मंत्रिपदाची संधी देण्यात आली आहे.
आमदार लक्ष्मी हेब्बाळकर या सध्या एकमेव महिला मंत्री असून त्यांना विजयनगर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.