कर्नाटक सरकारने आपल्या गृह ज्योती गॅरंटी योजनेसाठी सर्वसमावेशक मार्गदर्शक सूची नुकतीच जारी केली आहे. राज्यातील सर्वांना परवडणाऱ्या दरात वीज उपलब्ध व्हावी हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
सदर योजनेनुसार विजेचा दरमहा 200 युनिट पेक्षा कमी वापर करणाऱ्या ग्राहकांना वीज मोफत मिळणार असून त्यापेक्षा अधिक युनिट वापरणाऱ्यांना संपूर्ण वीज बिल भरावे लागणार आहे.
विजेचे बिल कमी करून जास्तीत जास्त कुटुंबांना दिलासा देण्याच्या हेतूने गृह ज्योती योजना आखण्यात आली आहे. ही योजना व्यावसायिक अथवा अन्य कारणांसाठी वीजेचा वापर करणाऱ्यांसाठी नसून फक्त कुटुंबासाठी वीज वापरणाऱ्यांसाठी आहे.
सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांनी सेवा सिंधू पोर्टलद्वारे आधार कार्डसह कस्टमर आयडी /अकाउंट आयडी लिंक करून अर्ज करावयाचा आहे. सदर योजनेची परिणामकारक अंमलबजावणी व्हावी यासाठी मागील वर्षात किती वीज वापरली त्याची सरासरी काढून तितक्या युनिट विजेसह 10 टक्के अधिक वीज सरकार मोफत देणार आहे.
ही मर्यादा दरमहा 200 युनिट विजेचा वापर करणाऱ्या कुटुंबांसाठी असणार आहे. त्याचप्रमाणे 200 युनिट पेक्षा अधिक विजेचा वापर करणाऱ्या कुटुंबांना विजेचे संपूर्ण बिल भरावे लागणार आहे.
ही योजना जुलै 2023 पासून अंमलात आणली जाणार असून नवी मार्गदर्शक सूची ऑगस्ट 2023 पासून लागू होणार आहे. यासाठी दरमहा मीटर रीडिंग घेऊन त्यानुसार विजेचे बिल दिले जाईल. योजनेचे लाभार्थी म्हणून ज्या कुटुंबांची निवड करण्यात आली असेल त्यांना 200 युनिट वजा करून त्यांनी त्यापेक्षा अधिक वापरलेल्या विजेचे बिल दिले जाईल, जे त्यांना अदा करावे लागेल.
जर लाभार्थी कुटुंबाचे बिल पात्र युनिट पेक्षा कमी असेल तर त्यांना ‘शून्य’ बिल दिले जाईल. दरमहा 200 युनिटपेक्षा कमी विजेचा वापर करणाऱ्या आणि या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या ग्राहकांना सेवा सिंधू पोर्टलद्वारे अर्ज करावा लागेल.
अर्ज करताना त्यासोबत लाभार्थीने त्यांच्या आधार कार्डसह कस्टमर आयडी /अकाउंट आयडी जोडणे आवश्यक आहे. गृह ज्योति योजनेमध्ये सध्या अस्तित्वात असलेल्या भाग्य ज्योती /कुटीर ज्योती योजना आणि अम्रिता ज्योती योजनेच्या लाभार्थींचा समावेश असेल.