Saturday, June 15, 2024

/

फ्लायओव्हरचा प्रस्ताव प्रत्यक्षात आणावा : शेतकऱ्यांची मागणी

 belgaum

बेळगाव लाईव्ह : कर्नाटकात सत्तेवर येताच काँग्रेसच्या नव्या सरकारने बेळगाव शहराची वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी महत्वपूर्ण पाऊल पुढे टाकत फ्लायओव्हर्स निर्मितीला प्राधान्य दिले आहे. फ्लायओव्हरचा प्रकल्प कागदोपत्री न राहता प्रत्यक्षात उतरावा असे मत शेतकरी नेत्यांसह स्थानिक शेतकरी बांधव व्यक्त करत आहेत.

बहुचर्चित हलगा -मच्छे बायपास रस्ता आणि रिंग रोडमुळे नष्ट होणारी शेकडो एकर सुपीक जमीन फ्लाय ओव्हरमुळे वाचणार आहे आणि शेतजमीन वाचल्यास शेतकरीही वाचणार आहे. याखेरीज वाहतूक कोंडीचा प्रश्न निकालात निघणार आहे. तेंव्हा या प्रकल्पाची तात्काळ अंमलबजावणी व्हावी, असे मत शेतकरी नेत्यांसह स्थानिक शेतकरी बांधवांनी व्यक्त केले आहे.

बेळगाव शहरातील फ्लाय ओव्हर ब्रिजचे सध्या नियोजन केले जात आहे. हा ब्रिज हालगा -मच्छे बायपास रस्ता आणि बेळगाव रिंग रोडला पर्याय ठरू शकतो का? या संदर्भात ‘बेळगाव लाईव्ह’ने आज गुरुवारी सकाळी बेळगावच्या स्थानिक शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. त्यावेळी उपरोक्त मत व्यक्त केले गेले. ‘बेळगाव लाईव्ह’शी बोलताना रयत संघटनेचे बेळगाव तालुका अध्यक्ष राजू मरवे म्हणाले की, कर्नाटकातील सध्याचे नवनिर्वाचित काँग्रेस सरकार हे फक्त शेतकऱ्यांनी अस्तित्वात आणले आहे हे ध्यानात घेतले पाहिजे. याचा विद्यमान सरकारने गांभीर्याने विचार करावा. ताज्या माहितीनुसार बेळगाव शहरासाठी गांधीनगर, पिरनवाडी, चन्नम्मा सर्कल असे फ्लाय ओव्हर ब्रिज तयार करण्याचा एक नवा प्रकल्प सरकार राबवत आहे. या प्रकल्पाला आमचा पाठिंबा असून त्यासाठी आम्ही सरकारचे अभिनंदन करतो. कारण बेळगाव शहर परिसर व ग्रामीण भागात अल्पभूधारक शेतकरी असल्यामुळे शेतीचे नुकसान न करता सदर प्रकल्प होणार असल्यामुळे तो शेतकऱ्यांचा हिताचा आहे. तेंव्हा शेतकऱ्यांच्या जमिनी वाचविणारा नियोजित फ्लाय ओव्हर प्रकल्प सरकारने अवश्य राबविला पाहिजे.

 belgaum

शेतकरी महेश चतुर यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना, जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी साहेबांनी मांडलेला फ्लाय ओव्हर ब्रिज प्रकल्पाचा प्रस्ताव हा शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. मात्र हा प्रकल्प फक्त कागदोपत्री न राहता प्रत्यक्षात उतरविला जावा ही आम्हा शेतकऱ्यांची इच्छा आहे असे सांगितले. सदर प्रकल्पामुळे हलगा -मच्छे बायपास रस्ता आणि रिंग रोडसाठी संपादित केली जाणारी शेतकऱ्यांची सुपीक जमीन वाचेल. त्याचप्रमाणे सदर दोन्ही प्रकल्पाच्या तुलनेत फ्लाय ओव्हर प्रकल्पामुळे सरकारच्या पैशाची बचत आणि जनतेची सोय होईल. आज शेतकरी टिकला तर देश टिकेल अशी परिस्थिती आहे. तेंव्हा सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी हा फ्लाय ओव्हर ब्रिज प्रकल्प तात्काळ राबवावा, असेही चतुर यांनी स्पष्ट केले.Satish j fly over

शेतकरी चंद्रकांत कोंडुसकर यांनी आपले मत व्यक्त करताना, भारत हा कृषिप्रधान देश आहे आणि शेतकरी टिकला तरच आपला देश टिकेल. शेतकरी हा अन्नदाता असण्याबरोबरच आज त्यांची मुलं संरक्षण दलात भरती होऊन देशसेवा देखील करत आहेत. थोडक्यात शेतकरी देशवासीयांच्या पोटाची सोय करण्याबरोबरच देश संरक्षणाचे कार्य देखील करत आहे. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन शेतकऱ्यांच्या हितासाठी फ्लाय ओव्हर ब्रिज होणे अत्यावश्यक आहे असे सांगून काँग्रेस सरकारने बेळगावात फ्लाय ओव्हर ब्रिज बांधण्याचा जो निर्णय घेतला आहे तो अत्यंत योग्य आहे, असे नमूद केले.

बेळगाव रिंग रोड प्रकल्प प्रत्यक्षात उतरू नये अशी आम्हा शेतकऱ्यांची तीव्र इच्छा आहे. हलगा -मच्छे बायपास रस्ता आणि रिंग रोडमुळे शहराच्या आसपासची सुपीक शेत जमीन नष्ट होणार आहे. मात्र फ्लाय ओव्हरमुळे ही शेतजमीन वाचणारा असून त्यामुळे शेतकरी चांगला सधन होईल आणि शेतकरी सधन झाला तर देशाचीही भरभराट होईल. सध्याच्या काँग्रेस सरकारचे वैशिष्ट्य म्हणजे सत्तेवर येतात त्यांनी बेळगावातील फ्लाय ओव्हरच्या मुद्द्याला हात घातला ही आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. कारण मागील सरकारने फक्त विविध घोषणा करून जनतेच्या तोंडाला पाणी पुसली आहेत. मात्र आता शेतकरी खुश आहे आणि फ्लाय ओव्हर व्हावा अशी आमची इच्छा आहे, अशी प्रतिक्रिया एका प्रगतशील ज्येष्ठ शेतकऱ्याने दिली.

फ्लाय ओव्हर ब्रिजमुळे शेतकऱ्यांच्या जमिनी वाचतील. गोरगरीब शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह सुरळीत चालेल. तसेच वाहतूक कोंडीच्या समस्येचे निवारण होईल. बायपास आणि रिंग रोडमुळे जाणाऱ्या शेतजमिनी फ्लाय ओव्हर ब्रिजमुळे वाचतील पर्यायाने शेतकरी वाचणार आहे. वाहतूक समस्या निकालात निघणार ही सर्वात चांगली गोष्ट आहे. फ्लाय ओव्हर योजनेच्या घोषणेमुळे सर्व शेतकरी आनंदित झाले आहेत हालगा -मच्छे बायपास मध्ये आमच्या जमिनी गेल्या आहेत. बायपासच्या विरोधात आम्ही गेली अनेक वर्ष लढत आहोत. मध्यंतरी न्यायालयाचा स्थगिती आदेश असतानाही या रस्त्याचे काम सुरू ठेवून आमच्यावर अन्याय केला गेला. मात्र आता मंत्री सतीश जारकीहोळी यांनी चांगले पाऊल उचलले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगले दिवस येणार आहेत, अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.