श्री कपिलेश्वर मंदिर ट्रस्ट, सव्यसाची गुरुकुलम आणि श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान महाद्वार रोड विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मुला मुलींसाठी शिवकालीन युद्ध कला आणि आत्म संरक्षणाचे धडे अवगत करण्यासंदर्भात आयोजित 10 दिवसांचे प्रशिक्षण शिबिर काल गुरुवारी यशस्वीरित्या पार पडले.
शहरातील श्री कपिलेश्वर गणपती विसर्जन तलाव परिसरामध्ये गेल्या 15 ते 25 मे या कालावधीत या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर शिबिरात शिवकालीन युद्ध कला आणि संरक्षण प्रशिक्षणाचे धडे देण्यात आले.
शिबिराला मुला-मुलींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. लाठीकाठी, भाला, पट्टा, भारतीय व्यायाम, सूर्यनमस्कार, दंड -बैठका, स्वसंरक्षण व ज्ञान प्रबोधन चिंतन वर्ग इत्यादीचे शिबिरात प्रशिक्षण देण्यात आले. शहरी भागातील विद्यार्थ्यांमध्ये छ. शिवाजी महाराजांच्या काळापासून सुरू जोपासण्यात आलेली प्राचीन मर्दानी युद्ध कलेविषयी आवड निर्माण करणे, त्यांच्यात शौर्य निर्माण करणे, प्रतिकारशक्ती वाढविणे,
शारीरिक चापल्य व कौशल्य वृत्ती वाढविणे, संरक्षणासाठी विद्यार्थ्यांना सक्षम बनविणे, महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेल्या युवतींना आत्मसंरक्षणाचे धडे देणे आदी उद्दिष्टे नजरेसमोर ठेवून श्री कपिलेश्वर महादेव ट्रस्ट, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान महाद्वारोड विभाग आणि सव्यसाची गुरुकुलम यांनी हे शिबिर आयोजित केले होते. आता शिवकालीन युद्ध कला व आत्मसंरक्षणाचे प्रशिक्षण इच्छुक शाळा हायस्कूल -महाविद्यालयांमध्ये हे प्रशिक्षण आयोजित करण्याचे ध्येय आहे.
श्री कपिलेश्वर गणेश विसर्जन तलाव परिसरात काल गुरुवारी पार पडलेल्या शिबिराच्या सांगता समारंभाप्रसंगी प्रशिक्षक अंश महेश पेथानी, लखन भिमराव पोवार, आणि अंनकुल फट्टू वरंडेकर यांच्यासह बेळगाव मधील प्रसिद्ध लाटीपटू यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी श्री कपिलेश्वर मंदिराचे सर्व ट्रस्टी व सेवेकरी तसेच परशुराम कुरणे, बाळू पुजारी, दामोदर पुजारी, पुंडलिक पाटील, राहुल मोरे, मलखांब प्रशिक्षक सागर लाखे आदींसह पालक आणि हितचिंतक बहुसंख्येने उपस्थित होते. शिबिरार्थी मुला -मुलींना शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी उदय शिंदे व हिरामणी मुचंडीकर यांचेही मार्गदर्शन लाभले. समारंभाचे सूत्रसंचालन, प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन अभिजीत चव्हाण यांनी केले. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी दौलत जाधव, राहुल कुरणे आणि विनायक किणेकर यांनी विशेष परिश्रम घेतले.