बेळगाव लाईव्ह : दक्षिण विधानसभा मतदार संघाचे म. ए. समितीचे अधिकृत उमेदवार रमाकांत कोंडुसकर यांनी आज विरोधकांना खुले आव्हान देत आगामी निवडणुकीत जनताच आपले उत्तर देईल, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
आज श्री शिवजयंतीच्या निमित्ताने वडगाव भागातील वझे गल्ली, कारभार गल्ली, पाटील गल्ली यासह विविध परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे त्यांनी पूजन केले. यावेळी बोलताना त्यांनी विरोधकांवर सडकून टीका करत खुले आव्हान दिले.
मालमत्ता कर, पाणीपट्टी, वीजबिल यासारख्या माध्यमातून जनता नियमित कर भरते. जनतेच्याच कराच्या माध्यमातून उभारलेला निधी विकासकामांसाठी वापरण्यात येतो. मात्र येथील लोकप्रतिनिधी गेल्या पाच वर्षात स्वतःच्या खिशातून आपण खर्च करून विकासकामे केल्याचा अविर्भाव दाखवत आहेत.
विकास हा जनतेचा मूलभूत अधिकार आहे. विकास हा कुना एकाच्या खिशातील पैशाने होत नाही तर जनतेच्या पैशातून होत असतो. आमदार असो किंवा नसो विकास हा जनतेचा अधिकार आहे. गेल्या कित्येक निवडणुकीत याप्रकारे जनतेला कुणीही त्रास दिला नाही. जनतेला धमकाविले नाही. दादागिरी आणि दडपशाही केली गेली नाही. मात्र सध्या जनतेवर दडपशाही करून मत घालण्यासाठी दबाव आणण्यात येत आहे.
यामुळे जनतेमध्ये दहशत पसरली आहे, हे अत्यंत चुकीचे आहे. यामुळे आगामी निवडणुकीत योग्य उमेदवार निवडावा, पैसे घेऊन आपल्या मताची किंमत करू नये, आणि पैशांसाठी स्वाभिमान विकू नये, असे आवाहन रमाकांत कोंडुसकर यांनी केले.