Saturday, April 27, 2024

/

लिंगायत समाज एकवटू शकतो तर मग मराठी मनेच दुभंगलेली का?

 belgaum

बेळगाव लाईव्ह : विधानसभा निवडणूक असो किंवा आरक्षणाचा मुद्दा.. गेल्या वर्ष – दीड वर्षात लिंगायत समाज मोठ्या प्रमाणात एकवटला आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरदेखील काही वर्षांपूर्वी मराठा समाज एकवटला होता. मात्र एकवटून केलेल्या आंदोलनाला मराठा समाजाला म्हणावे तसे यश मिळाले नाही. आंदोलन झाले पण आंदोलनात सातत्य नसल्याने आणि मराठी समाजाला खंबीर नेतृत्व नसल्याने मराठा समाजाच्या मागण्या पिछाडीवर पडल्या असे म्हटल्यास काहीच वावगे ठरू नये.

सध्या राज्यभरात विधानसभा निवडणुकीसाठी वातावरण निर्मिती होत आहे. चारीबाजूंनी निवडणुकीची तयारी सुरु आहे. यादरम्यान लिंगायत समाजाला उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी उचलून धरत आज विविध लिंगायत संघटनांनी एकत्र येऊन बैठक घेतली. जो राष्ट्रीयपक्ष लिंगायत समाजाला प्राधान्य देईल त्या पक्षाला लिंगायत समाज मोठ्या संख्येने पाठिंबा देईल, असेही या बैठकीत जाहीर करण्यात आले. सीमाभागात ज्याप्रमाणे लिंगायत समाजातील मतदारांची संख्या अधिक आहे त्याचप्रमाणे मराठी भाषिक मतदारांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. मराठी भाषिकांची ओळख असणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीमध्ये फूट पडल्याने आज मराठी भाषिक विखुरला आहे. यामुळेच सीमाभागातील मराठी भाषिकांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. ‘एकीचे बळ, मिळते फळ’ या उक्तीप्रमाणे आता मराठी माणसाने पेटून उठणे गरजेचे आहे.

ज्यापद्धतीने लिंगायत समाज एकवटून आपल्या मागण्यांसाठी संघर्ष करत आहे, त्याच धर्तीवर मराठी भाषिकांनी देखील एकवटून आपले हक्क मिळविण्यासाठी आणि आपली अस्मिता जपण्यासाठी एकवटणे गरजेचे आहे. सीमाभागात ज्यापद्धतीने मराठी भाषिकांना डावलले जाते, मराठी भाषिकांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवले जाते या सर्व गोष्टींना प्रत्त्युत्तर देण्यासाठी आणि आपले हक्क मिळविण्यासाठी मराठी भाषिकांनीही राष्ट्रीय पक्षांकडे मराठी भाषिक उमेदवार देण्याची मागणी करणे गरजेचे आहे.

 belgaum

आज लिंगायत समाजाने ज्यापद्धतीने एकी दाखवत आपल्या समाजाला उमेदवारी मिळविण्यासाठी निर्धार केला आहे त्यानंतर सोशल मीडियावर मराठी भाषिक तरुणांनी देखील आपल्या समाजासाठी आवाज उठविण्यास सुरुवात केली आहे. सीमाभागात आजवर ज्यापद्धतीने मराठी भाषिक तरुणांवर अन्याय झाले, विविध आंदोलनांमध्ये कशापद्धतीने केवळ मराठी भाषिक तरुणांना टार्गेट करण्यात आले यावर सडेतोड कमेंट्स देत आजवर बेळगावमधील इतर मराठी समाज वगळता इतर कोणत्या समाजातील तरुणांवर केसीस दाखल केल्या आहेत? असा प्रश्न उपस्थित केला आहे. राष्ट्रीय पक्षांच्या वळचणीला आज अनेक तरुण गेले आहेत, हि बाब खरी आहे. मात्र राष्ट्रीय पक्षात जाऊनदेखील आपल्या समाजासाठी किती तरुणांनी आवाज उठविला आहे? हाही प्रश्न उपस्थित होत आहे.

केवळ निवडणुकीपुरता मराठी समाजातील तरुणांचा आणि मराठी भाषिकांचा वापर राष्ट्रीय पक्षांकडून केला जातो. मात्र इतरवेळी मराठी समाजाचा जाणीवपूर्वक विसर पडणाऱ्या राष्ट्रीय पक्षांना आणि राष्ट्रीय पक्षाच्या नेत्यांना मराठी भाषिकांची ताकद दाखविण्याची संधी चालून आली आहे. त्यामुळे आता हीच ती वेळ आहे. हि वेळ आणि संधी न दवडता आपल्या समाजासाठी आवाज उठविणे नितांत गरजेचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.