एसएसएलसी अर्थात दहावीची परीक्षा अवघ्या कांही दिवसावर येऊन ठेपल्यामुळे शिक्षण खाते जय्यत तयारीला लागले असून बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील 120 परीक्षा केंद्रावर दहावीची परीक्षा पार पडणार आहे. त्याचप्रमाणे 33,182 विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत.
सध्या बारावीची परीक्षा सुरू असून ही परीक्षा संपल्यानंतर येत्या 29 मार्चपासून दहावीच्या परीक्षेला सुरुवात होणार आहे. मागील कोरोना काळात बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील 189 केंद्रांवर दहावीची परीक्षा घेण्यात आली होती. मात्र यंदा 120 केंद्रांवर ही परीक्षा होणार असून सर्व केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असणार आहे. परीक्षा केंद्राच्या ठिकाणी विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी आवश्यक सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची सूचना करण्यात आली आहे. दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत बस प्रवास करण्याची मुभा असणार आहे.
बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील विभाग परीक्षा केंद्रांची संख्या आणि विद्यार्थ्यांची संख्या अनुक्रमे पुढील प्रमाणे आहे. बेळगाव शहर : 27 केंद्रे, 8614 विद्यार्थी. बेळगाव ग्रामीण : 19, 5735. बैलहोंगल : 17, 4025. खानापूर : 16, 3758. रामदुर्ग : 14, 4151. सौंदत्ती : 20, 5128 कित्तूर : 7 केंद्रे, 1771 विद्यार्थी. या पद्धतीने एकूण 120 केंद्रांवर 33,182 विद्यार्थी -विद्यार्थिनी यावेळी दहावीची परीक्षा देणार आहेत.