विधान सभा निवडणुकीसाठी एकीकडे बेळगाव तालुका समिती खानापूर समिती सक्रिय होऊन आघाडी घेत गावोगाव पिंजून काढली जात आहेत मात्र शहर महाराष्ट्र एकीकरण समितीची एकही बैठक घेतली जात नाही त्यामुळे समितीनिष्ट कार्यकर्त्यात नाराजी व्यक्त होत आहे.
17 जानेवारी रोजी झालेला शहरातील हुतात्मा दिनाचा कार्यक्रम कोणतीही बैठक न घेता केवळ पत्रका वर उरकण्यात आला एकीकडे तालुका समितीच्या जीवावर मध्यवर्ती समितीच्या बैठका लावणे त्यातूनच आपली उपयुक्तता सिद्ध करणे या व्यतिरिक्त शहरातील मध्यवर्ती समितीचे नेते कोणतीही हालचाल करताना दिसत नाही आहेत असाही आरोप केला जात आहे.
शहर समितीतील सक्रिय कार्यकर्ते मदन बामणे यांनी अगोदर घेतल्या गेलेल्या बैठकांतून अनेकदा आपले विचार व्यक्त करत असताना समितीच्या पुनर्रचनेची मागणी लावून धरली आहे पण त्या मागणीला नेत्यांनी किंमत दिलेली नाही.मनपा निवडणुकीच्या पराभवा नंतर अनेक युवकांनी शहर समितीत सक्रिय होण्यासाठी अर्ज देऊन एक वर्ष उलटले तरी अद्याप शहर समिती कडून कोणतीच पाऊले टाकली जात नसल्याने मदन बामणे यांच्या सह अनेकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
बुधवारी मध्यवर्ती समितीची बैठक होणार आहे बेळगाव तालुक्याच्या जीवावर या बैठकीत मुंबई मोर्चाची घोषणा केली जाईल मात्र शहर समितीचे काय? कधी सक्रिय होणार हा प्रश्न मात्र अनुत्तरीत आहे.
शहर समितीचे नेते सुप्रीम कोर्टाचे कामकाज करण्यात व्यस्त असले तर दुसऱ्या फळीतील नेते तयार करणे इतर सक्रिय लोकांवर जबाबदाऱ्या देणे बैठका घेणे किंवा इतर रणनीती करणे या सगळ्या बाबतीत बेळगाव तालुका समिती पुढे असताना शहर मागे का? याचे गौडबंगाल काय? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.
धामणे (ये)सारख्या बेळगाव दक्षिण भागात येणाऱ्या गावाने समितीची बैठक घेत आगामी निवडणुकीत एकचं उमेदवार द्यावा तो लवकर जाहीर करावा निवडणुकीत ऐन वेळी समिती म्हणून येऊ नये असा इशारा देत बैठक घेतली आहे. शहर समिती निष्क्रिय झाल्यास प्रत्येक गावात गल्लीतून असा आवाज येऊ शकतो यावर विचार करण्याची वेळ आली आहे.