बेळगाव लाईव्ह : ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर बेळगावकर शहरवासीयांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत असून शहरातील पाणीपुरवठ्याचे नियोजन कोलमडले आहे. महिन्याभरात केवळ दहा दिवस पाणीपुरवठा झाल्याने शहरवासीयांना पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर पाणी टंचाईची समस्या निर्माण झाल्याने नागरीकातून संताप व्यक्त होत आहे.
शहराच्या पाणीपुरवठाची जबाबदारी एल. अँड टी. कंपनीकडे सोपविण्यात आली आहे. आणि यानंतरच पाणीपुरवठ्याबाबत तक्रारी वाढल्याचे निदर्शनात आले आहे.
दुरुस्तीच्या नावाखाली दोन ते चार दिवस पाणीपुरवठा बंद ठेवला जात असल्याने शहरवासीयांना पाण्यासाठी कसरत करावी लागत आहे. फेब्रुवारीतच राकसकोप जलाशयातील पाणीसाठा कमी झाला आहे.
त्यातच रविवारी पुन्हा अर्ध्या फुटाने पाणी कमी झाले असून उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच पाणी टंचाईची झळ शहरवासीयांना सहन करावी लागत असून आगामी काळात पाणी मिळणार की नाही याची चिंता नागरिकांना लागली आहे.
शहरात पाणीटंचाईची समस्या गंभीर झाली असून दर आठ दिवसांतून एकदा दुरुस्तीच्या नावाखाली पाणीपुरवठा बंद ठेवला जात आहे. दुरुस्तीचे काम निघाल्यास दोन दिवस पाणीपुरवठा बंद ठेवला जात असल्याचे एल अँड टी कंपनीकडून सांगण्यात येते. मात्र, प्रत्यक्षात चार ते पाच दिवस पाणीपुरवठा करण्यात येत नाही. यापूर्वी पाण्यासाठी दोन ते तीन दिवस प्रतीक्षा करावी लागत होती. आता आठ ते दहा दिवस झाले तरी पाणी मिळत नाही. त्यामुळे पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ शहरवासीयांवर आली असून एल अँड टी कंपनीच्या कारभाराबद्दल संताप व्यक्त केला जात आहे.
जानेवारी महिन्यात दि. १९ रोजी दुरुस्तीकामासाठी सलग तीन दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला होता. त्यानंतर हिडकल जलवाहिन्यांच्या दुरुस्तीकरिता दि. ३० जानेवारी रोजी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आल्याने दि. ३०, ३१ व १ फेब्रुवारी असे तीन दिवस शहरवासीयांना पाणी मिळाले नाही. त्यानंतर दि. ८ फेब्रुवारीला जलवाहिनीला गळती लागल्याने कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली असून नागिरकांना पाणी पाणी म्हणण्याची वेळ आली आहे.
नागरिक स्वखर्चाने टँकर मागवत आहेत. ऐन उन्हाळ्यात टँकरचे दर देखील वाढले असून एका टँकरला ६०० ते ८०० रुपये मोजावे लागत असल्याने आर्थिक भुर्दंड सहन कराला लागत आहे. पाणीपुरवठा विस्कळीत झाला असल्याने शहरवासीयांचे नियोजन पूर्णपणे कोलमडल्याचे चित्र आहे.