एका राजकीय अभ्यास करणाऱ्या संस्थेने केलेल्या खानापूर तालुक्याच्या पाहणीत अजातशत्रू व्यक्तिमत्व असलेले विठ्ठल हलगेकर यांना सर्व स्थरातील नागरिकांनी पाहिली पसंती दिल्याचे उघड झाले आहे. मुंबई येथील त्या संस्थेने तालुक्यातील मतदारांचा कौल नेमका कुठे आहे हे पाहण्यासाठी नुकतेच एक सर्वेक्षण केले असून विधानसभा निवडणूक २०२३ मध्ये जनतेचा कौल विठ्ठल हलगेकर यांनाच असल्याचे म्हटले आहे. या संस्थेने आपला हा अहवाल एका वृत्तवाहिनीला देण्यासाठी बनविला असून लवकरच त्याचे प्रक्षेपण होणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
खानापुरात विद्यमान आमदार या काँग्रेस पक्षाच्या आहेत. अंजली निंबाळकर या आमदार पदावर असलेल्या व्यक्तीलाच पक्ष पुन्हा तिकीट देणार हे निर्विवाद सत्य आहे. या पार्श्वभूमीवर या विद्यमान आमदारांना मतांच्या बाबतीत टक्कर देऊन भाजपला विजय संपादित करून घ्यायचा असेल तर नेमके काय करावे लागेल ? कोणाला उमेदवारी द्यावी लागेल? याचा अभ्यास या सर्वेक्षणात झाला आहे. यावेळी भाजप ने विठ्ठल हलगेकर यांना तिकीट दिल्यास यावेळी पुन्हा भाजप आपले खाते खानापूर तालुक्यात खोलू शकते, असे मत अनेक जाणकार व्यक्त करत आहेत. तालुक्यातील जनतेनेही असाच कौल दिला आहे. अशी माहिती मिळाली आहे.
लैला शुगर्स च्या माध्यमातून झालेले भरीव काम, शेतकऱ्यांच्या उसाची वेळेत झालेली उचल, निर्धारित काळात मिळणारी बिले हे प्रमुख कारण विठ्ठल हलगेकर यांच्या लोकप्रियतेत महत्वाची भूमिका बजावत असल्याची माहिती मिळाली आहे. गेल्या २० वर्षात त्यांनी केलेली समाजोपयोगी कामे आणि सर्वच स्तरातील नागरिकांशी जिव्हाळ्याचे संबंध यामुळे त्यांना जनतेच्या मनातील उमेदवार ही ओळख प्राप्त झाली आहे. अनेकजण तिकीट आपल्यालाच मिळणार असा दावा करीत आहेत. मात्र विठ्ठल हलगेकर यांना तिकीट दिले तर भाजपच्या बरोबर नाहीतर विठ्ठल हलगेकर यांच्याच बरोबर असा कौल तालुक्यातील ८० टक्के जनतेने दिल्याची माहिती मिळाली आहे.
भाजप मध्येही अनेकजण उत्सुक आहेत. यापैकी समिती मधून भाजपवासी झालेल्या अरविंद पाटील यांचा समावेश आहे. अनेक जुने भाजप नेते आणि कार्यकर्ते आहेत, दरम्यान भाजपला विजयी पताका मिरवायची असल्यास विठ्ठल हलगेकर या नावावर शिक्कामोर्तब करावे लागेल असा कौल विशेषतः तरुण आणि महिलावर्गातून आला आहे. हलगेकर यांच्या नंतर भाजप मधून दुसरी पसंती अरविंद पाटील आहेत तर नुकताच एकी झालेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या रेशो देखील वाढत असल्याचे निष्कर्ष काढण्यात आले आहेत. विशेष म्हणजे जुन्या समितीनिष्ठ मतदारांनीही हा आपल्यातील माणूस वाटतो असा कौल दिला असल्याने विठ्ठल हलगेकर हे बाजी मारणार असे वातावरण निर्माण झाले आहे.
मागील निवडणुकीत निसटता झालेला त्यांचा पराभव यावेळी भरून काढणार असाच चंग खानापूर तालुक्यातील जनतेने घेतला असल्याची माहिती या सर्वेक्षणाच्या निमित्ताने उघड झाली आहे.