बेळगावच्या महापौरपदी भाजपच्या शोभा सोमनाचे आणि उपमहापौरपदी रेश्मा पाटील यांची निवड झाली असली तरी ही योगायोगाने झालेली निव्वळ अपघाती निवड असल्याची प्रतिक्रिया माजी महापौर व माजी आमदार रमेश कुडची यांनी व्यक्त केली आहे.
बेळगाव महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक काल सोमवारी दुपारी सुरळीत पार पडली. या निवडणुकी संदर्भात माध्यमांशी बोलताना माजी आमदार कुडची यांनी उपरोक्त प्रतिक्रिया व्यक्त केली.
बेळगावच्या महापौर आणि उपमहापौर पदी विराजमान झालेल्या दोन्ही महिला पहिल्यांदाच नगरसेविका बनल्या आहेत. शहराचे सोडा त्यांचा स्वतःच्याच प्रभागातील एखाद्या सामाजिक कार्याशी दूरचाही संबंध आलेला नाही. मात्र तरीही एक महिला म्हणून मी त्यांचा आदर करतो आणि म्हणूनच आता यापुढे कोणाच्या हातचे रबर स्टॅम्प न बनता या दोन्ही महिलांनी महापौर व उपमहापौर म्हणूनच कार्य करावे.
यासाठी महापौर शोभा सोमनाचे आणि उपमहापौर रेश्मा पाटील या उभयतांना त्यांच्या भावी यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो, असे माजी आमदार रमेश कुडची शेवटी म्हणाले.
रमेश कुडची हे आपल्या राजकीय कारकिर्दीत तीन वेळा नगरसेवक, दोन वेळा बेळगावचे महापौर, एकदा विरोधी पक्षनेते आणि दोन वेळा बेळगावचे आमदार झाले होते, हे विशेष होय.