बहुचर्चित म्हादाई नदीवरील कळसा -भांडुरा प्रकल्पाला मंजुरी मिळाली नसून आता धारवाड -हुबळीसह इतर भागांचा पाणी प्रश्न सुटला अशा प्रकारचे नाटक करून भाजप सरकार जनतेची फसवणूक करत असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी केला आहे.
कक्केरी (ता. खानापूर) येथे निधर्मी जनता दलातर्फे आयोजित पंचरत्न यात्रेप्रसंगी ते बोलत होते. कळसा -भांडुरा प्रकल्पाला मंजुरी मिळाली असून आता धारवाड -हुबळीसह इतर भागांचा पाणी प्रश्न सुटला अशा प्रकारचे नाटक करून पेढे वाटणारे भाजप सरकार नाटकी आहे.
अद्यापही या प्रकल्पास सुरुवात झाली नसून वनखात्याची मंजुरीही प्रलंबित आहे असे असताना विजयोत्सव केला गेला.
त्यांनी जनतेला फसवले असून सातत्याने उत्तर कर्नाटकावर अन्याय केला असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी केला. भाजप काँग्रेसमधील नेत्यांची भांडणे पाहून जनता कंटाळली आहे.
दोन्ही पक्षांमध्ये फूट पडली असून एकमेकांवर चिखल फेक करण्यात ते मग्न आहेत. राज्यात प्रादेशिक पक्षाच्या माध्यमातून सुरक्षित आणि चांगले सरकार देण्याच्या उद्देशाने गेल्या अडीच महिन्यापासून निधर्मी जनता दल पक्षाच्या 5 महत्त्वाच्या कार्यक्रमांची यादी मतदारांसमोर ठेवून पंचरत्न कार्यक्रम हाती घेतला असल्याचेही त्यांनी सांगितले.